सेम टू सेम आठवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 05:34 AM2018-05-19T05:34:54+5:302018-05-19T05:34:54+5:30
जे पोटात तेच ओठात असणारे बिनधास्त, निर्भीड व्यक्तिमत्त्व म्हणून रामदास आठवले यांचा देशात मोठा चाहतावर्ग आहे.
मुंबई : जे पोटात तेच ओठात असणारे बिनधास्त, निर्भीड व्यक्तिमत्त्व म्हणून रामदास आठवले यांचा देशात मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना केंद्रात स्थान दिले आहे. रामदास आठवले हे केवळ केंद्रीय राज्यमंत्री नाहीत तर संघर्षातून पुढे आलेले लोकप्रिय नेते आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
सह्याद्री अतिथीगृहात शुक्रवारी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, पत्नी सीमा आठवले, मुलगा जीत आठवले, सुनील्स वॅक्स म्युझियमचे प्रमुख सुनील कंडलूर उपस्थित होते. रामदास आठवले यांचा मेणाचा पुतळा लोणावळ्यात सुनील्स वॅक्स म्युझियममध्ये ठेवण्यात येईल.
समाजाला योग्य दिशा देणारे नेतृत्व असल्यानेच केंद्र सरकारमध्ये आता ते मंत्रिपदी आहेत. त्यापेक्षा मोठे स्थान त्यांना निश्चित मिळणार हे नक्की. कलाकाराने आठवलेंचा पुतळा हुबेहूब तयार केला आहे. खरे कोण आणि खोटे कोण आहे ते ओळखणे अवघड झाले आहे. मात्र जे कोणी कविता म्हणून दाखवेल तेच खरे आठवले म्हणून ओळखायचे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना या वेळी व्यक्त केल्या.
आठवले यांनी, हा पुतळा कोणाचा आहे? माझाच की मेणाचा असे काव्यात विचारले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते माझ्या पुतळ्याचे अनावरण झाले. त्यांच्या पुतळ्याचे लवकरच माझ्या हस्ते अनावरण होईल. महाराष्ट्राच्या समाजकारण, राजकारणाला सांधण्याचे उत्कृष्ट काम अभ्यासू मुख्यमंत्र्यांनी केले, असे आठवले म्हणाले. पालघरमध्ये सेनेने भाजपाचा उमेदवार पळविला. मात्र पळवापळवीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्रीसुद्धा हुशार आहेत, अशी टोलेबाजीही त्यांनी या वेळी केली.