Join us

'आम्ही करू तीच पूर्व दिशा', शरद पवारांची मोदी सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 5:53 PM

सीबीआयप्रमुख अलोक वर्मा यांची एका रात्रीत उचलबांगडी करण्यात आली. त्यामुळे मोदी सरकारच्या कारभारावर अनेक प्रश्न निर्माण झाले.

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकार आणि भाजपाच्या हुकूमशाही धोरणावर टीका केली. सीबीआयसारख्या देशातील महत्वाच्या आणि स्वतंत्र यंत्रणांच्या प्रमुखांना एका रात्रीत काढण्यात आले. सीबीआयच्या प्रमुखांना घरी पाठवण्याचा निर्णय मध्यरात्री देशातील राज्यकर्त्यांकडून घेण्यात आला. यावरुन आम्ही करू तीच पूर्व दिशा, असा मोदी सरकारचा कारभार असल्याची टीका शरद पवार यांनी केली.

सीबीआयप्रमुख अलोक वर्मा यांची एका रात्रीत उचलबांगडी करण्यात आली. त्यामुळे मोदी सरकारच्या कारभारावर अनेक प्रश्न निर्माण झाले. सरकारच्या या धोरणाचा विरोधकांकडून तीव्र निषेध करण्यात आला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनीही मोदींच्या सीबीआयवरील कारवाईचा विरोध केला. तसेच अलोक वर्मा हे राफेल करारांच्या कागदोपत्रांची जुळवाजुळव करत होते. त्यामुळेच, वर्मा यांनी उचलबांगडी केल्याचं राहुल यांनी म्हटले. आता, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही मोदींचा कारभार मनमानी असल्याचे म्हटले आहे.

'निःपक्षपातीपणे चौकशी व्हायला हवी, यासाठी सीबीआय ही स्वतंत्र यंत्रणा आहे. मात्र, सीबीआयच्या प्रमुखांना घरी पाठवण्याचा निर्णय मध्यरात्री देशातील राज्यकर्त्यांकडून घेण्यात आला. त्याने स्पष्ट आहे की आम्ही सांगू तीच पूर्व दिशा असा या सरकारचा कारभार आहे. सरकारचा हा कारभार देशासाठी घातक आहे', असे पवार यांनी पुण्यातील कार्यक्रमात म्हटले. तसेच आपल्या ट्विटर अकाऊंटवरुनही पवारांनी, सीबीआय प्रमुख अलोक वर्मांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याच्या धोरणावर टीका केली. तसेच विशेष म्हणजे, ज्या व्यक्तीच्या चौकशी सुरू आहेत, त्यांना प्रमुख म्हणून त्यांच्या जागी नेमण्यात आले आहे. आम्ही जे वागू तेच बरोबर आहे, असे देशावर ठसवण्यात आल्याचे पवार यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :शरद पवारनरेंद्र मोदीगुन्हा अन्वेषण विभाग