काकांचा आधार घेत समीर भुजबळांनी मागितला जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 06:16 AM2018-05-16T06:16:59+5:302018-05-16T06:16:59+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची ४ मे रोजी उच्च न्यायालयाने जामिनावर सुटका केली.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची ४ मे रोजी उच्च न्यायालयाने जामिनावर सुटका केली. याच आदेशाचा आधार घेत छगन भुजबळ यांचे पुतणे व महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील सहआरोपी समीर भुजबळ यांनीही आपल्याला जामिनावर सोडण्यात यावे, अशी विनंती उच्च न्यायालयाला मंगळवारी केली आहे.
दिल्लीच्या महाराष्ट्र सदन गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने छगन भुजबळ व समीर भुजबळ यांना २०१६मध्ये अटक केली. या दोघांनीही आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप ईडीने केला आहे. समीर भुजबळ यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील विक्रांत चौधरी यांनी उच्च न्यायालयाच्या उन्हाळी सुटीकालीन न्यायालयाला सांगितले की, या प्रकरणातील मुख्य आरोपी छगन भुजबळ यांचा जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे. त्यामुळे समीर भुजबळ यांचाही अंतरिम जामीन मंजूर झाला पाहिजे.
पीएमएलए कायद्यानुसार, अशा आरोपीला सात वर्षांचा कारावास भोगावा लागतो. त्यापैकी समीर भुजबळ यांनी दोन वर्षे कारागृहात काढली आहेत, असे चौधरी यांनी न्यायालयाला सांगितले. या प्रकरणाचा तपास संपला आहे. मुख्य आरोपीचा जामीन मंजूर करण्यात आल्याने समीर भुजबळही जामिनावर सुटका करून घेण्यास पात्र आहेत. या प्रकरणातील ५३ आरोपी जामिनावर आहेत. केवळ समीर भुजबळ एकटा कारावासात आहे, असा युक्तिवाद चौधरी यांनी न्यायालयात केला. न्यायालयाने आता या याचिकांवरील सुनावणी १७ मे रोजी ठेवली आहे.