तस्कर सजनानी कनेक्शन : वांद्रेतील घर, कार्यालयावर छापे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अमली पदार्थ खरेदीशी संबंध असल्याचा प्रकरणातून अटकेत असलेल्या राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री आणि मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता साेमवार, १८ जानेवारीपर्यंत एनसीबी कोठडी मिळाली. दरम्यान,त्याच्या वांद्रे येथील घर व कार्यालयावर छापे टाकले. तेथून दस्तऐवज व काही वस्तू जप्त केल्या असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
परदेशी ड्रग्ज तस्कर करण सजनानीशी ड्रग्ज तस्करीतून आर्थिक व्यवहार झाल्याच्या आरोपावरून एनसीबीने त्यांना बुधवारी रात्री अटक केली होती. त्यापूर्वी त्यांची दहा तास सखोल चौकशी करण्यात आली होती.
करण सजनानीला सुमारे २०० किलो परदेशी गांजासह अटक केली होती. त्याच्याकडे चौकशीतून समीर खानचे नाव समोर आले. करनच्या खात्यावर त्यांच्याकडून ऑनलाईन २० हजार रुपये पाठविण्यात आले होते. गुरुवारी सकाळी साडेसहा वाजल्यापासून एनसीबीच्या पथकाने त्यांच्या वांद्रे येथील मनोर सोसायटीमधील फ्लॅट व कार्यालयावर छापे टाकले. खानचे बँक व अन्य आर्थिक व्यवहाराबाबतची दस्तऐवज, कागदपत्रे तसेच त्याचे लॅपटॉप, मोबाईल व अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तू ताब्यात घेतल्या.
दरम्यान, समीर खान यांना सकाळी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता १८ जानेवारीपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यांचे सजनानीशी असलेले लागेबांधे, ड्रग्ज तस्करीतील सहभाग, आदींबाबत चौकशी करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
* आणखी एका परदेशी नागरिकाला अटक ब्रिटिश नागरिक करन सजनानी याच्या अटकेतून परदेशी ड्रग्ज कनेक्शन उघडकीस आले आहे. त्याचबरोबर याप्रकरणी एनसीबीने गुरुवारी आणखी एका परदेशी नागरिकाला अटक केली. सजनानीला भेटण्यासाठी तो मुंबईत येऊन उपनगरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये उतरला होता. एनसीबीच्या पथकाने त्याला त्याठिकाणी जाऊन अटक केली. त्याचे नाव व तपशीलाबाबत अधिकाऱ्यांनी गुप्तता बाळगली आहे.