Join us

समीर वानखेडे यांना ‘महाराष्ट्र सन्मान’ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 4:07 AM

मुंबई : डॅशिंग अधिकारी म्हणून नावलौकिक असलेल्या समीर वानखेडे यांना सैनिक फेडरेशनच्या वतीने ‘महाराष्ट्र सन्मान अवॉर्ड - २०२१’ने सन्मानित ...

मुंबई : डॅशिंग अधिकारी म्हणून नावलौकिक असलेल्या समीर वानखेडे यांना सैनिक फेडरेशनच्या वतीने ‘महाराष्ट्र सन्मान अवॉर्ड - २०२१’ने सन्मानित करण्यात आले. कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

समीर वानखेडे हे सध्या नार्कोटिक कंट्रोल ब्युरोमध्ये (एनसीबी) मुंबई विभागाचे प्रमुख आहेत. अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्येशी निगडित ड्रग्ज प्रकरणात त्यांनी बॉलिवूडमधील अमलीपदार्थांच्या जाळ्याची पाळेमुळे खणून काढली. अलीकडेच नागपाड्यात ड्रग्जच्या कारखान्यावर छापा घालून त्यांनी कोट्यवधींची रोकड जप्त केली. अंडरवर्ल्डशी संबंधित आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट उद्‌ध्वस्त करण्यातही त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. त्यांच्या या कामगिरीची दखल घेऊन ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांच्या सैनिक फेडरेशनच्या वतीने त्यांना ‘महाराष्ट्र सन्मान अवॉर्ड - २०२१’ने सन्मानित करण्यात आले.

समीर वानखेडे हे २००८ बॅचचे भारतीय राजस्व सेवेतील (आयआरएस) अधिकारी आहेत. आयआरएस सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची नियुक्ती मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उपयुक्त म्हणून करण्यात आली. कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी अल्पावधीतच गुन्हेगारी प्रवृत्तींवर वचक निर्माण केला. त्यामुळेच त्यांना आंध्रप्रदेश आणि त्यानंतर दिल्लीतही महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये तपास अधिकारी म्हणून पाठविण्यात आले.

अमलीपदार्थ किंवा तत्सम क्लिष्ट गुन्ह्यांचा छडा लावणारे चाणाक्ष प्रशासकीय अधिकारी म्हणून आज वानखेडे यांची ओळख आहे. सोशल मीडियावर त्यांचा मोठा चाहतावर्ग असून अनेक तरुणांचे ते आयडॉल आहेत.