Join us

Aryan Khan: “लाडक्या आर्यनला बेल मिळाल्यानं NCP, शिवसेनेचा जीव भांड्यात पडला; आतातरी जनतेच्या प्रश्नाकडं लक्ष द्या”; भाजपाचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 8:45 AM

BJP Target Nawab Malik and Sanjay Raut: आता तरी त्या अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल का? असा प्रश्न भाजपानं विचारला आहे.

मुंबई – गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरण चांगलेच गाजतंय. या प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा(Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानला NCB नं अटक केली. त्यानंतर देशभरात याची चर्चा सुरु झाली. २ ऑक्टोबरला आर्यनला ताब्यात घेतलं त्यानंतर कोर्टाने अनेकदा जामीन फेटाळला. त्यानंतर अखेर २८ ऑक्टोबरला हायकोर्टाने आर्यन खानला(Aryan Khan) जामीन मंजूर केला.

आर्यनला जामीन मिळाल्यानंतर भाजपानं राष्ट्रवादी(NCP), शिवसेनेला(Shivsena) खोचक सवाल विचारले आहेत. भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये(BJP Keshav Upadhye) म्हणाले की, राष्ट्रवादी, शिवसेना नेत्यांच्या लाडक्या आर्यनला एकदाचा बेल मिळाला. त्यामुळे त्यांचा जीव भांड्यात पडला. आता तरी त्या अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल का? आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या गोंधळांनी हताश विद्यार्थ्यांकडे पाहणार का? असं भाजपानं विचारलं आहे.

तसेच राज्यातील वाढत्या अत्याचाराच्या घटनांनी महिलांना असुरक्षित वाटत आहे त्यांना दिलासा मिळणार का? मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) जनतेच्या प्रश्नावर कधी पत्रकार परिषद घेणार का? असंही भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी विचारलं आहे. या प्रकरणावरुन राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने आरोप लावले होते. रोज सकाळी ट्विट आणि पत्रकार परिषद घेत मलिकांनी वानखेडे यांच्याविरोधात मोर्चा उघडला होता. बोगस जात प्रमाणपत्र, भ्रष्टाचार, निकाहनामा जारी करत वानखेडे कुटुंब बोगस असल्याचा आरोप केला होता.

नवाब मलिकांविरोधात वानखेडे कुटुंब पोलीस ठाण्यात

नवाब मलिक यांनी तपास अधिकारी समीर वानखेडे(Sameer Wankhede) यांच्याविरोधात सातत्याने केलेल्या आरोपामुळे वानखेडे कुटुंबानेही समोर येऊन उत्तर देण्यास सुरुवात केली. मलिकांविरोधात समीर वानखेडे यांची बहीण यास्मिन वानखेडे यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. तसेच या प्रकरणाची तक्रार राष्ट्रीय महिला आयोगाकडेही केली आहे. एका महिलेचे फोटो तिच्या परवानगी सोशल मीडियावर पोस्ट करून तिची बदनामी केल्याचा आरोप यास्मिन यांनी मलिकांवर केला आहे.

टॅग्स :आर्यन खानसंजय राऊतनवाब मलिकभाजपा