मलिकांच्या स्पेशल-26 आरोपांना समीर वानखेडेंचं अवघ्या तीन शब्दांत प्रत्युत्तर; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 02:01 PM2021-10-26T14:01:06+5:302021-10-26T14:03:22+5:30

नवाब मलिकांच्या ३७ मिनिटांच्या पत्रकार परिषदेला वानखेडेंकडून ३ शब्दांत प्रत्युत्तर

Sameer Wankhede calls Nawab Maliks letter a joke says do whatever you want | मलिकांच्या स्पेशल-26 आरोपांना समीर वानखेडेंचं अवघ्या तीन शब्दांत प्रत्युत्तर; म्हणाले...

मलिकांच्या स्पेशल-26 आरोपांना समीर वानखेडेंचं अवघ्या तीन शब्दांत प्रत्युत्तर; म्हणाले...

Next

मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. क्रूझ शिप ड्रग्ज पार्टीवर (Cruise Ship Drugs Party) करणाऱ्या वानखेडेंवर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक सातत्यानं आरोप करत आहेत. आज सकाळी पत्रकार परिषद घेत मलिक यांनी वानखेडेंवर गंभीर आरोप केले. वानखेडेंनी केलेल्या २६ कारवायांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मलिक यांनी त्यांच्यावर फोन टॅपिंगचे आरोप लावले. याशिवाय बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवल्याचा आरोपदेखील केला. या आरोपांना वानखेडेंनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिलं आहे.

एनसीबीच्या एका अज्ञात अधिकाऱ्यानं पाठवलेलं पत्र मलिक यांनी पत्रकार परिषदेत दाखवलं. त्यात वानखेडेंनी केलेल्या २६ संशयास्पद कारवायांचा उल्लेख आहे. हे पत्र 'विनोदी आणि खोटं' असल्याचं वानखेडेंनी म्हटलं आहे. त्या पत्रातला आशय खोटा आहे. मलिक यांना हवं ते करू दे, असं वानखेडे म्हणाले. 'हे सगळं विनोदी आणि खोटं आहे. त्यांना केलेले आरोप खोटे आहेत,' अशी प्रतिक्रिया वानखेडेंनी दिली.

मलिक यांचे वानखेडेंवर आरोप
आमची लढाई एनसीबीसोबत नाही. एनसीबीनं अनेकदा चांगलं काम केलं आहे. परंतु एक व्यक्ती बोगसगिरी करून नोकरी घेतो आणि ज्यावेळी या बाबी समोर आणल्या, त्यावेळी मात्र वानखेडे म्हणतात माझ्या कुटुंबावर नवाब मलिक आरोप करत आहेत. मी हिंदू मुस्लिम असा मुद्दा समोर आणत नव्हतो. भाजपने अनेकवेळा म्हटलं, नवाब मलिक मुस्लिम असल्यामुळे अशाप्रकारे आरोप करत आहेत. मात्र मी कधीही असं केलं नाही. समीर वानखेडेंनी खोटा जन्म दाखला सादर करून नोकरी घेतली. ही गोष्ट चुकीची आहे, असं मलिक पत्रकार परिषदेत म्हणाले.

वानखेडे यांच्याविरुद्ध सुरू केलेली लढाई आम्ही अशीच पुढे घेऊन जाणार आहोत, असं मलिक यांनी सांगितलं. मी जो दाखला ट्विट केला आहे तो खरा आहे. जर तुम्ही लक्षपूर्वक दाखला पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की त्यावर नाव वेगळं एका बाजूला लिहिण्यात आलं आहे. समीर वानखेडे जन्मापासून दलित आहेत असं सर्टिफिकेट दिलं. त्याआधारे आत्तापर्यंत नोकरी केली. समीर यांच्या वडिलांनी एका मुस्लिम महिलेसोबत लग्न केलं आणि त्यानंतर ते मुस्लिम म्ह्णून राहत होते. परंतु नोकरीच्या वेळी त्यांनी आपला दाखला बदलला. त्यांनी वडिलांच्या जातीचा वापर केला. जर मी सादर केलेलं सर्टिफिकेट खोटं आहे तर मग त्यांच्या वडिलांनी किंवा स्वतः वानखेडे यांनी आपलं जन्म प्रमाणपत्र समोर आणावं, असं आव्हान मलिक यांनी दिलं.

मला वैयक्तिक बदनामी करायची नाही. परंतु समीर वानखेडेंच्या वडिलांनी धर्मातर करून विवाह केला होता. समीर यांनी बनावट जात प्रमाणपत्र बनवून 'आयआरएस' नोकरी घेतली. याबाबत आपण ठाम आहोत. त्यांनी आपल्या विरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल करावा, न्यायालयात सर्व सत्य बाहेर येईल, असं मलिक म्हणाले.

अनेक बड्या लोकांचे फोन टॅप
वानखेडेंकडून अनेक राजकारणी, बॉलिवूड कलाकार, बिल्डरांचे फोन टॅप केले जातात. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे दोन खासगी व्यक्तींद्वारे काही व्यक्तींचे फोन टॅपिंग करत आहेत. यातील एक व्यक्ती मुंबईतील आणि दुसरी व्यक्ती ठाण्यातील आहे, असा दावादेखील मलिक यांनी केला.

Web Title: Sameer Wankhede calls Nawab Maliks letter a joke says do whatever you want

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.