Sameer Wankhede: कॉर्डिलिया ड्रग्ज प्रकरणातील सदोष तपास आणि आर्यन खानला सोडण्यासाठी मागितलेल्या २५ कोटी रुपयांच्या खंडणी आरोपावरून एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांची सीबीआयने चौकशी केली. यात आता समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सीबीआयने समीर वानखेडे यांची कसून चौकशी करताना एकामागून एक सुमारे १५ प्रश्न विचारून त्यावर स्पष्टीकरण मागितले आहे.
समीर वानखेडे यांना उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला असून, २२ मे पर्यंत अटक न करण्याचे निर्देश दिले आहेत. यानंतर आता सीबाआयने समीर वानखेडे यांची चौकशी केली. चौकशीनंतर मीडियाने समीर वानखेडे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. मात्र केवळ ‘सत्यमेव जयते’ असे म्हणत निघून गेले. या प्रकरणात सीबीआयने प्रथमच समीर वानखेडेची चौकशी केली. चौकशीची पुढील तारीख निश्चित झालेली नाही. समीर वानखेडे यांना पुढील चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलेले नाही. सीबीआयने त्याला विचारलेले काही प्रश्न आर्यन खान आणि किरण गोसावी यांच्यातील संबंध आणि छापेमारीच्या माहितीशी संबंधित होते, असे सांगितले जात आहे.
सीबीआयने समीर वानखेडे यांना नेमके कोणते प्रश्न विचारले?
- कॉर्डिलिया ड्रग्ज प्रकरणात एनसीबी मुंबईचे विभागीय संचालक म्हणून काम करत असताना तुम्ही क्रूझ टर्मिनलवर उपस्थित होता का?
- कोणत्या आधारे छापा टाकण्यात आला, याची प्राथमिक माहिती काय होती?
- या माहितीचा स्रोत काय होता?
- आर्यन खानबद्दल काही विशिष्ट माहिती होती आणि एजन्सीला त्याच्याशी संबंधित काही इनपुट मिळाले होते का?
- काही रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की, मनिष भानुशाली या साक्षीदाराने मीडियाला सांगितले होते की, त्याने आर्यन खानला क्रूझवर ड्रग्ज घेऊन जाण्याबाबत माहिती दिली होती, हे खरे आहे का?
- अधिकारी टर्मिनलवर आर्यन खानची वाट पाहत होते का?
- केपी गोसावींना कधीपासून आणि कसे ओळखता?
- केपी गोसावी यांच्यावर गुन्हे दाखल होते, तुम्हाला त्याची माहिती आहे का?
- केपी गोसावी संशयितांना पकडल्यानंतर का हाताळत होते?
- विशेषत: आर्यन खानला केपी गोसावी यांच्यासोबत कारमधून एनसीबी कार्यालयात का आणण्यात आले?
- केपी गोसावी हे आर्यन खानपर्यंत कसे पोहोचले आणि ते एकमेव साक्षीदार असल्याचा आरोप का करण्यात आला?
- तुम्ही शाहरुख खानसोबत फोन कॉलवर किती वेळा बोललात?
- या केससंबंधी तुम्ही शाहरुख खानला भेटलात का? आणि जर भेटलात तर किती वेळा भेटलात?
- या प्रकरणात झालेल्या १८ कोटींच्या डीलसंबंधी तुमच्याकडे काय माहिती आहे?
- आर्यन खानला अटक झाल्यानंतर शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीशी तुम्ही किती वेळा फोनवर बोललात? काय बोलणे झाले?
- तुम्ही गेल्या काही महिन्यांमध्ये तब्बल ७ वेळा परदेशात प्रवेश केला होता. या प्रवास तुम्ही कोणाच्या खर्चावर केला?
- तुमची मालमत्ता तुमच्या पगारापेक्षाही जास्त आहे का? आणि जर असेल तर या मालमत्तांसाठी तुमच्याकडे कुठून पैसा आला?
- तुमच्याकडे लाखोंच्या किमतीची घड्याळे आहेत? ती कुठून आणली?
- आर्यन खानच्या प्रकरणामध्ये २७ जणांची यादी होती. पण फक्त १० जणांनाच अटक करण्यात आली. बाकीच्यांना सोडण्याच्या बदल्यामध्ये तुम्ही पैसे घेतल्याचा आरोप होत आहे. यावर तुमचे काय म्हणणे आहे? नेमके सत्य काय?
- आर्यन खानला अटक झाल्यानंतर पूजा ददलानीसोबत पैशांचा व्यवहार झाला होता. यामध्ये तुमचाही हात असल्याचा आरोप होत आहे. यावर तुम्ही काय सांगाल?
- तुम्ही सूचना दिल्यानंतरच पैशांचा करार केला असा आरोप किरण गोसावी यांनी केला आहे. या आरोपावर तुम्ही काय स्पष्टीकरण द्याल?