मुंबई : क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी आर्यन खानवरील कारवाई टाळण्यासाठी २५ कोटींची लाच मागितल्याचा आरोप झालेल्या एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची बुधवारी उच्चस्तरीय चौकशी समितीने साडेचार तास चौकशी केली. पंच साक्षीदार प्रभाकर साईल याने शपथपत्राद्वारे त्यांच्यावर केलेले गंभीर आरोपांच्या अनुषंगाने त्यांची सविस्तर विचारणा करून जबाब नोंदविण्यात आला. आवश्यकतेनुसार त्यांच्याकडून आणखी काही कागदपत्रे जमा केली जाणार आहेत.
क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणावरून झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी ज्ञानेश्वर सिंह यांच्या नेतृत्वाखाली नेमलेल्या पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी समिती बुधवारी मुंबईत दाखल झाली. या समितीने दिवसभर क्रूझवरील कारवाईसंबंधी सर्व कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. तसेच संबंधित तपास अधिकाऱ्यांची चौकशी सुरू केली. त्यानंतर समीर वानखेडे यांच्याकडे दोन टप्यात तब्बल साडेचार तास चौकशी केली.
एनसीबीचे उपमहासंचालक व या चौकशी समितीचे प्रमुख ज्ञानेश्वर सिंह म्हणाले की, एनसीबीचे महासंचालकांच्या सूचनेनुसार समितीने चौकशी सुरू केली आहे. याबाबतची सर्व कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. वानखेडे यांची जवळपास साडेचार तास सविस्तर चौकशी केली आहे. त्यांच्याकडून आवश्यकतेनुसार काही कागदपत्रे ताब्यात घेतली जातील. या प्रकरणातील प्रभाकर साईल व के. पी. गोसावी यांना नोटीस काढली होती.
मात्र साईल हा नमूद पत्त्यावर आढळून आला नाही, तर गोसावीचे घर बंद असल्याने त्यांना ती मिळू शकलेली नाही. त्यामुळे त्यांनी गुरुवारी किंवा शुक्रवारी वांद्रे येथे समिती समोर येऊन म्हणणे मांडावे. त्याबाबत चौकशी पूर्ण करून वरिष्ठांकडे अहवाल दिला जाईल. वानखेडे यांना चौकशीपासून बाजूला हटविणार का, याबाबत विचारणा केली असता त्यांनी आता याबद्दल काहीही बोलणे योग्य होणार नाही. असे सांगत त्याबाबत भाष्य करणे टाळले.
मीडियाच्या माध्यमातून सिंह यांचे आवाहनसाक्षीदार प्रभाकर साईल व के. पी. गोसावी यांना नोटीस न मिळाल्याने त्यांनी दोन दिवसांत हजर रहावे, असे मीडियाच्या माध्यमातून ज्ञानेश्वर सिंह यांनी त्यांना आवाहन केले आहे.