Sameer Wankhede, Nawab Malik: समीर वानखेडेंच्या वडिलांनी नवाब मलिकांविरोधात उच्च न्यायालयात घेतली धाव, वाचा काय आहे प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 06:05 PM2022-01-20T18:05:43+5:302022-01-20T18:05:52+5:30
गेल्या काही महिन्यांत वानखेडे आणि मलिक यांनी एकमेकांवर अनेक दोषारोप केले आहेत.
मुंबई: विविध कारणांमुळे गेल्या काही महिन्यांमध्ये चर्चेत असलेले अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी राज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांनी एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप केले. त्यानंतर नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंचे वडील यांच्या संदर्भातही काही आरोप केले होते. त्यावरूनच ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिकांविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका दाखल केली आहे.
नवाब मलिक यांनी हायकोर्टात सांगितले होते की वानखेडे यांच्याविरोधात ते कुठलेही आक्षेपार्ह वक्तव्य करणार नाहीत. तसेच, मुंबई उच्च न्यायालयात नवाब मलिक यांनी बिनशर्त माफीही मागितली होती. पण जानेवारी महिन्याच्या सुरूवातीला नवाब मलिक यांनी वानखेडे कुटुंबियांच्या विरोधात काही आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप ज्ञानदेव वानखेडे यांनी केला आहे. त्यामुळे न्यायालयाचा अवमान केल्याचा आरोप करत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
ज्ञानदेव वानखेडे हे सेवानिवृत्त सरकारी अधिकारी आहेत. जून २००७ मध्ये सेवानिवृत्तीच्या वेळी ते राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. मलिक यांना आपला मुलगा (समीर वानखेडे) आणि कुटुंबातील इतर सदस्यांबाबत बदनामीकारक आणि अपमानास्पद टिप्पणी आणि पोस्ट करण्यापासून रोखण्यासाठी त्यांनी गेल्या वर्षी खटला दाखल केला होता.
वानखेडे यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, मलिक यांनी '१० डिसेंबर २०२१ रोजी प्रतिज्ञापत्राद्वारे बिनशर्त माफी मागितली होती' आणि १० डिसेंबर २०२१ रोजी दिलेल्या आदेशानुसार, उच्च न्यायालयाने त्यांची बिनशर्त माफी स्वीकारली होती. मात्र जानेवारी महिन्याच्या सुरूवातीला त्यांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांनी याचिकेत केला आहे.