समीर वानखेडेंच्या वडिलांनी ऑनलाइन काजू मागिवले, सायबर भामट्यांनी गंडविले, ३१ हजार गमावले
By गौरी टेंबकर | Published: October 25, 2023 06:08 AM2023-10-25T06:08:49+5:302023-10-25T06:09:17+5:30
एक रुपया देऊन ३१ हजार उकळले
गाैरी टेंबकर – कलगुटकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : निवृत्त सहायक पोलिस आयुक्त तसेच भारतीय महसूल सेवा अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे (७४) यांनी ऑनलाइन काजू मागवले होते. मात्र, सायबर भामट्यांनी त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी त्यांनी ओशिवरा पोलिसांकडे तक्रार केल्यावर अनोळखी व्यक्तीच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
तक्रारदार वानखेडे यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, त्यांनी २२ ऑक्टोबर रोजी दुपारी दाेन वाजण्याच्या सुमारास फेसबुकवर सुक्या मेव्याची जाहिरात पाहिली होती. त्यात मॅप ऑफ मंगलम ड्रायफ्रूट आणि अजित बोरा या नावाचा उल्लेख करत मोबाइल नंबर व नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटचाही पत्ता नमूद करण्यात आला होता.
वानखेडे यांना काही ड्रायफ्रूट्स खरेदी करायचे असल्याने त्यांनी सदर क्रमांकावर फोन केला. त्यानंतर बदाम, काजू, अंजीर आणि अक्रोड अशी जवळपास दाेन हजार रुपये किमतीचा सुका मेवा त्यांनी ऑर्डर केला. त्याचे पैसेदेखील यूपीआयमार्फत पाठवले. मात्र, त्यांना पुन्हा त्याच क्रमांकावरून फोन आला आणि वानखेडे यांचे ड्रायफ्रूटचे पार्सल तयार झाले असून जीएसटीमुळे ते लॉक झाल्याचे सांगत अनलॉक करावे लागेल, असे सांगितले.
एक रुपया देऊन ३१ हजार उकळले
- सायबर भामट्यांनी तेव्हा वानखेडेंना पैसे परत करण्याचे भासवत बँक खात्याचा प्रॉब्लेम असल्याचे सांगत एक रुपया पाठवला.
- तसेच गुगल पे मध्ये जाऊन तो जे कोड देतोय ते टाका आणि सबमिट करा, असे सांगितले.
- वानखेडेंनी त्याच्यावर विश्वास ठेवत तसेच केले आणि त्यांच्या खात्यातून काही पैसे पाठवले.
- भामट्यांनी नंतर थोडी थोडी रक्कम काढत जवळपास त्यांना ३१ हजार १९ रुपयांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी त्यांनी बोरा याच्याविरोधात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी समीर वानखेडे यांना बांगलादेशातून जीवे मारण्याची धमकी फोनवर मिळाली होती. याप्रकरणी त्यांनी पोलीस आयुक्तांना ईमेल मार्फत तक्रार मिळाल्यावर गोरेगाव पोलीस तपास करत आहेत. तसेच दोन वर्षांपूर्वी ते नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई झोनचे प्रमुख असताना बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याचा समावेश असलेल्या कथित ड्रग जप्तीच्या प्रकरणासह काही हाय-प्रोफाइल प्रकरणे हाताळताना ते चर्चेत आले होते.