मुंबई: एनसीबीच्या मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. वानखेडेंचं जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला होता. त्यामुळे वानखेडे अडचणीत सापडले. आता जात प्रमाणपत्र समितीनं वानखेडेंना नोटीस पाठवली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत भर पडली आहे.
कॉर्डेलिया क्रूझवरील कारवाईवरून समीर वानखेडे चर्चेत आले. त्यावेळी ते एनसीबीच्या मुंबई विभागाचे संचालक होते. या कारवाईवर नवाब मलिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. वानखेडेंचं जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा आरोप मलिक यांनी केली. त्यांनी या संदर्भात जात पडताळणी समितीकडे तक्रार केली.
जात पडताळणी समितीनं मलिक यांच्या तक्रारीची दखल घेतली आहे. समितीकडून वानखेडेंना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तुमचं जात प्रमाणपत्र रद्द का करू नये, असा सवाल समितीकडून वानखेडेंना विचारण्यात आला आहे. यामुळे वानखेडेंच्या अडचणी वाढल्या आहेत.
जात पडताळणी समितीनं २९ एप्रिलला वानखेडेंना नोटीस बजावली. या नोटिशीसंदर्भात वानखेडेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नोटिशीला उत्तर देण्यासाठी अधिकचा वेळ मिळावा असा वानखेडेंचा प्रयत्न आहे. या नोटिशीला वानखेडे नेमकं काय उत्तर देणार याकडे लक्ष लागलं आहे.