Join us

समीर वानखेडे दिल्लीतील NCBच्या मुख्यालयात दाखल, खात्यांतर्गत चौकशी होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 1:46 PM

ड्रग्स पार्टी छाप्यातील पंच प्रभाकर साईलने समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केले आहेत.

नवी दिल्ली: मागील काही दिवसांपासून राज्यात फक्त NCB आणि नवाब मलिक(Nawab Malik) यांच्यातल्या आरोप-प्रत्यारोपांचीच चर्चा आहे. यात आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबईतील विभागीय संचालक समीर वानखेडे(Sameer Wankhede) आज दिल्लीत दाखल झाले आहेत. एनसीबीच्या दिल्ली मुख्यालयाने गंभीर दखल घेत वानखेडेंना तातडीने दिल्लीला बोलावणे पाठवले होते. या प्रकरणी वानखेडेंची दिल्लीत खात्यांतर्गत चौकशी होणार आहे.

मुंबई-गोवा क्रुझमधील ड्रग्ज पार्टीवर टाकलेल्या छाप्यात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि इतर काहीजण सापडले होते. हे प्रकरण हळुहळून वाढत केले आणि यात महाराष्ट्रातील मंत्री नवान मलिक यांची एंट्री झाली. यानंतर या प्रकरणातील पंच असलेल्या प्रभाकर साईलने एक व्हिडीओ जारी करुन शाहरुख खानकडून 25 कोटींची मागणी केल्याचे गंभीर आरोप केले. तसेच, त्यातील 8 कोटी रुपये वानखेडेंना मिळणार होते, असेही साईलने सांगितले. या सर्व आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे. यानंतर आता एनसीबीच्या दिल्ली मुख्यालयाने या आरोपाची गंभीर दखल घेत समीर वानखेडे यांना दिल्लीत बोलावले आहे.

नवाब मलिकांचा मोठा गौप्यस्फोटआज सकाळी नवाब मलिक यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याबाबत अत्यंत खळबळजनक गौप्यस्फोट केला  होता. समीर वानखेडेंच्या कारवायांबाबत एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने नाव न प्रसिद्ध करता पाठवलेले पत्र प्रसिद्ध करत नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंनी केलेल्या २६ कारवायांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गंभीर आरोप केला होता. 

मलिकांच्या आरोपांवर क्रांती रेडकरचे स्पष्टीकरणनवाब मलिक यांनी केलेल्या बेछूट आरोपांना आता समीर वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. असं निनावी पत्र कुणीही लिहू शकतं. पत्र लिहिणाऱ्याने समोर येऊन आरोप करावेत, असे आव्हानही क्रांती रेडकर म्हणाल्या. पत्रकार परिषदेमध्ये नवाब मलिक यांनी प्रसिद्ध केलेल्या निनावी पत्राबाबत क्रांती रेडकर म्हणाल्या की, समीर वानखेडेवर करण्यात आलेले आरोप खोटे आहे. अशा प्रकारचं निनावी पत्र कुणीही पाठवू शकतो. ज्या पत्रावर कुणाचेही नाव नाही, कुणीही जबाबदारी घेत नाही, अशा पत्रावर आणखी काय बोलणार, आरोप करणाऱ्यांकडे पुरावे असतील तर त्यांनी ते सादर करावेत, असे आव्हान क्रांती रेडकर यांनी नवाब मलिक यांना दिले. 

टॅग्स :समीर वानखेडेनवाब मलिकक्रांती रेडकर