वानखेडेंनी महिन्याभरात ५-१० कोटींचे कपडे वापरले; मलिकांनी पँट, शर्ट, बुटांचा हिशोब सांगितला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 10:45 AM2021-11-02T10:45:02+5:302021-11-02T10:47:54+5:30
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांचे समीर वानखेडेंवर नवे आरोप; उंची राहणीमानावर बोट
मुंबई: क्रूझ ड्रग्ज पार्टीवर (Cruise Drug Party) छापा टाकून चर्चेत आलेले नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी समीर वानखेडेंवर (Sameer Wankhede) अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) सातत्यानं आरोप करत आहेत. त्यामुळे वानखेडेंच्या अडचणी वाढल्या आहेत. वानखेडेंनी खासगी आर्मी उभारली होती आणि त्यातून मोठ्या प्रमाणात पैशांचे व्यवहार सुरू होते, असा गंभीर आरोप मलिक यांनी केला.
एनसीबीमध्ये रुजू होताच वानखेडेंनी स्वत:ची खासगी आर्मी उभारली. त्यात किरण गोसावी, मनिष भानुशाली, फ्लेचर पटेल, आदिल उस्मानी, सॅम डिसुझा यांचा समावेश होता. या सगळ्यांच्या माध्यमातून शहरात ड्रग्जचा व्यवसाय सुरू होता. लहान प्रकरणं मोठी करून दाखवायची आणि मोठ्यांना सोडायचं, असे उद्योग या आर्मीकडून सुरू होते, असा गंभीर आरोप मलिक यांनी केला.
वानखेडेंच्या उंची राहणीमानावर सवाल
समीर वानखेडे अतिशय प्रामाणिक अधिकारी असल्याचं काही जण म्हणतात. मात्र गेल्या महिन्याभरात त्यांनी वापरलेल्यांची कपड्यांची किंमत ५ ते १० कोटी रुपयांच्या घरात आहे. वानखेडे कधीही त्यांचे कपडे रिपीट करत नाहीत. दररोज ते नवीन कपडे वापरतात. देशातील सगळ्या प्रामाणिक लोकांना वानखेडे यांच्यासारखं जगता यावं. सगळ्या प्रामाणिक व्यक्तींची जीवनशैली त्यांच्यासारखी व्हावी, असं मलिक म्हणाले.
दोन लाखांचे बूट, वीस लाखांचं घड्याळ; मलिकांचा दावा
समीर वानखेडेंनी गेल्या महिन्याभरात ५ ते १० कोटींचे कपडे वापरले आहेत, असा दावा मलिक यांनी केला. वानखेडे २ लाखांचे बूट, ७० हजारांचे शर्ट, ३० हजारांचे टी-शर्ट, १ लाखाची पँट वापरतात. ते वापरत असलेल्या घड्याळ्यांची किंमत २० लाखांपासून १ कोटीपर्यंत आहे. प्रामाणिक अधिकाऱ्याची ही जीवनशैली आहे. सर्व प्रामाणिक व्यक्तींनी अशाच प्रकारचं जीवन जगता यावं. राहणीमान आणि कपड्यांच्या बाबतीत वानखेडेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनादेखील मागे टाकलं आहे, असा खोचक टोला मलिक यांनी लगावला.