नवी दिल्ली: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडेंना मोठा दिलासा आहे. क्रूझ शिपवर अटक करण्यात आलेल्या आर्यन खानच्या सुटकेसाठी लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. दिल्लीहून आलेल्या एनसीबीच्या ५ अधिकाऱ्यांनी काल वानखेडेंची चौकशी केली. सध्या वानखेडेंची खाते अंतर्गत चौकशी सुरू आहे. वानखेडे यांच्याविरोधात ठोस पुरावे मिळेपर्यंत तेच या प्रकरणाचा तपास करणार आहेत. त्यांना या तपासातून न हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. वानखेडे यांच्यासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.
आर्यन खानच्या सुटकेसाठी अभिनेता शाहरूख खानकडून २५ कोटींची मागणी करण्यात आली होती. त्यातील ८ कोटी वानखेडेंना मिळणार होते, असा सनसनाटी आरोप एनसीबीच्या कारवाईमुळे साक्षीदार म्हणून उपस्थित असलेल्या प्रभाकर साईल यांनी केला. साईल यांच्या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली. वानखेडेंची खाते अंतर्गत चौकशी सुरू झाली. ही चौकशी पूर्ण होईपर्यंत वानखेडेंची मुंबईबाहेर बदली करण्यात येईल. त्यांच्याकडून या प्रकरणाचा तपास काढून घेण्यात येईल, अशा शक्यता वर्तवल्या जात होत्या. मात्र एनसीबीनं या प्रकरणाचा तपास वानखेडेंकडेच ठेवला आहे.
समीर वानखेडे यांची चौकशी सुरू आहे. त्यांच्याविरोधात सबळ पुरावे आढळून येईपर्यंत तेच क्रूझ शिप ड्रग्ज पार्टी प्रकरणाचा तपास करतील असी माहिती एनसीबीचे अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी दिली. ज्ञानेश्वर सिंह यांच्या नेतृत्त्वाखाली ५ अधिकाऱ्यांचं पथक वानखेडेंची चौकशी करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनीदेखील वानखेडेंवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. खंडणी, अवैध फोन टॅपिंग आणि बोगस कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवल्याचा आरोप मलिकांनी केला आहे.
समीर वानखेडेंनी या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रं जमा केली आहेत. आवश्यकता भासल्यास त्यांची पुन्हा चौकशी करण्यात येईल, असं एनसीबीचे अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितलं. शाहरूख खानकडून २५ कोटींची मागणी करण्यात यावी. १८ कोटींपर्यंत सेटलमेंट करावी आणि त्यातले ८ कोटी समीर वानखेडेंना द्यावी, असं के. पी. गोसावी फोनवर बोलत होते, ते संभाषण आपण ऐकलं, असा पंच साईल यांचा दावा आहे. एनसीबीच्या कारवाईवेळी खासगी हेर के. पी. गोसावी उपस्थित होते. साईल हे गोसावी यांचे अंगरक्षक आहेत.