मुंबई - मराठी असल्याचा मला अभिमान आहे. पण मला आणि मुलांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत हेही सत्य आहे. नवाब मलिकांच्या आरोपांवर बोलण्याची मला काहीही गरज नाही. त्यांना खरंतर वेळच उत्तर देईल, असं प्रत्युत्तर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी दिलं होतं. त्यानंतर, लोकमतशी बोलताना त्यांनी ठाकरे कुटुंबीयांवर आणि ठाकरे सरकारवर माझा विश्वास असल्याचं म्हटलंय.
माझा उद्धवजींवर विश्वास आहे, ठाकरे कुटुंबीय आणि महाराष्ट्र सरकारवर माझा पूर्णपणे विश्वास आहे. माझा महाराष्ट्र सरकारवर विश्वास आहे, एक माणूस सरकारला इन्फ्लुन्स नाही करू शकत. कारण, काहीही झालं तरी सत्य वर येणार. त्यावेळी, आपले मुख्यमंत्री सत्याचीच बाजू घेणार, असे अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी म्हटलंय. नवाब मलिक असं का वागतायंत ते मला कळत नाही, नवाब मलिक हे वैयक्तिक अजेंडा घेऊन विरोध करत असतील, यामागे अशी अनेक कारणं असू शकतात. मी समीर यांना एवढंच सांगितलंय की, तुम्ही तुमचं काम करा, कुणी काहीही आरोप करो, तुम्ही तुमचं काम करा, असे क्रांती रेडकर यांनी म्हटलंय.
क्रांती यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत समीर वानखेडे यांच्यावरील आरोपांवर स्पष्टीकरण दिलं. समीर वानखेडे यांच्यावर करण्यात आलेले आरोप पूर्णपणे खोटे असून त्यात काहीच तथ्य नाही. आरोप करणाऱ्या नवाब मलिकांना आमच्या शुभेच्छा आहेत. मीडिया ट्रायल करुन आरोप सिद्ध होत नाहीत. त्यांच्याकडे पुरावे आहेत तर मग ते ट्विटरवर का पोस्ट करतात? त्यांनी कोर्टात जावं, असं क्रांती रेडकर म्हणाल्या. यासोबत हे संपूर्ण प्रकरण सुरू झाल्यापासून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचाही खुलासा त्यांनी केला आहे.
माझ्या मुलांना जीवे मारण्याच्या धमक्या
"मी मराठी आहे आणि मला मराठी असल्याचा अभिमान आहे. पण मला आणि माझ्या मुलांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत हेही सत्य आहे. सोशल मीडिया, फोन कॉल्सवरुन तुम्हाला जीवे मारु, चौकात जीवंत जाळू अशा धमक्या येत आहेत. या धमक्यांचे सर्व स्क्रिनशॉट आमच्याकडे आहेत. ते सर्व फेक अकाऊंट्स आहेत आणि त्याची सायबर सेलच्या माध्यमातून यामागचा खरा सूत्रधार कोण हे शोधून काढणार आहे. समीर वानखेडेंना बदनाम करण्यासाठी यामागे एक संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे", असं क्रांती रेडकर म्हणाल्या.
शेवटी सत्याचाच विजय होतो
नवाब मलिक यांनी आज जाहीर केलेल्या पत्रावरही जोरदार टीका रेडकर यांनी केली. ज्यानं पत्र लिहिलंय त्यानं समोर येऊन आरोप करावा. सत्य आहे तर असं मागच्या मार्गानं का सांगायचं? थेट समोर येऊन जाहीर करावं. सत्याचा मार्ग अनेकांना खटकतो. पण शेवटी सत्याचाच विजय होतो. आम्ही केवळ ट्विटरबाजी करत नाही. नवाब मलिकांना योग्यवेळी उत्तर दिलं जाईल, असंही क्रांती रेडकर म्हणाल्या.