मुंबई – समीर वानखेडे(Sameer Wankhede) यांच्याविरोधात मंत्री नवाब मलिकांनी पुन्हा एकदा आरोप केला आहे. समीर वानखेडे आणि NCB ची चांडाळ चौकडीला पाठिशी घालू नका. फसवणूक करणाऱ्यांना पाठिशी घालू नका. माझी लढाई भाजपाविरोधात नाही. NCB विरोधात नाही तर चुकीच्या लोकांविरोधात आहे. मी सत्याची लढाई लढतोय. कुणाच्या धमकीला घाबरणार नाही असं मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) म्हणाले.
पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी सांगितले की, ६ प्रकरणातून समीर वानखेडे यांना वेगळं केले. त्यात आर्यन खान, समीर खानची केस आहे. ज्या प्रकरणाची चार्जशीट फाईल झाली त्यात पुन्हा तपासणी का करणार आहात? बोगस केस आहेत त्यात समरी दाखल करून निष्पापांना सोडून द्यावं. जीव धोक्यात घालून, कुटुंबाची पर्वा न करता ही लढाई लढतोय. पहिल्यांदाच NCB ने फॉरेन्सिक लॅबच्या रिपोर्टविरोधात कोर्टात आव्हानं केले आहे. ८ महिने काय तर २० वर्ष जेलमध्ये जाण्यास तयार असल्याचं जावई म्हणाला. त्यामुळे निष्पक्ष चौकशी करा. सत्य समोर आणा असं ते म्हणाले.
तसेच माझ्या आयुष्यात मी सुनील पाटीलला कधी भेटलो नाही. सुनील पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य नाही. सुनील पाटील अमित शाहसोबत फोटो आहेत. गुजरातच्या मंत्र्यांसोबत फोटो आहेत. आम्ही फोटोवर आरोप लावत नाही. सुनील पाटील हादेखील समीर वानखेडेच्या प्रायव्हेट आर्मीचा खेळाडू आहे. मी ६ तारखेला पत्रकार परिषद घेतली त्यानंतर २ तासाने मला सुनील पाटीलचा फोन आला. मला आणखी काही माहिती द्यायची असल्याचं सांगितलं. तेव्हा मी त्याला मुंबईत यायला सांगितले परंतु तो आला नाही. त्याला पोलिसांसमोर येऊन सत्य सांगायला बोललो तेव्हा तो गुजरातमध्ये असल्याचं सांगितले. अद्याप सुनील पाटील समोर आला नाही असंही नवाब मलिकांनी खुलासा केला.
दरम्यान, माझी लढाई NCB विरुद्ध नाही, भाजपाविरुद्ध नाही तर चुकीच्या लोकांविरोधात आहे. निष्पाप लोकांना फसवणूक करून त्यांच्याकडून वसुली केली जाते त्याविरोधात आहे. हजारो कोटींची वसुली करत असलेल्या अधिकाऱ्याला पाठिशी घालू नका. २६ प्रकरणांचा तपास करा आणि निष्पापांना सोडा. मला धमकावण्याचा प्रयत्न करु नका, ही सत्याची लढाई आहे. शाहरुख खानला घाबरवलं जात आहे. जे पीडित आहेत त्यांनी समोर यावं या लढाईत मला साथ द्यावी. कुणाला घाबरवून पैसे वसुल केले जात असतील तर पीडितांनी पुढे यावं असं आवाहनही नवाब मलिकांनी केले आहे.