समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ, 'आरोप गंभीर, चौकशी आवश्यक'; एनसीबीचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 11:39 PM2024-04-10T23:39:22+5:302024-04-10T23:42:38+5:30
समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एनसीबीने हायकोर्टात एक प्रतिज्ञापत्र दाखल केले असून यात आरोपांचे स्वरुप गंभीर असल्याचे म्हटले आहे. सखोल चौकशी करण्याची गरज असल्याचे यात म्हटले आहे.
एनसीबी मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एनसीबीने हायकोर्टात एक प्रतिज्ञापत्र दिले आहे. वानखेडे यांच्यावर करण्यात आलेल आरोप हे गंभीर स्वरुपाचे आहेत. या सगळ्या आरोपांची चौकशी करणे आवश्यक आहे, असं प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. आतापर्यंत समीर वानखेडे यांना आठ समन्स पाठवण्यात आले आहेत, पण वानखेडे चौकशीसाठी अजूनही हजर झालेल नाहीत, असंही प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
विरोधकांची अवस्था अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ; मुख्यमंत्री शिंदेंची बोचरी टीका
यामुळे आता कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. उच्च न्यायालयाने समीर वानखेडे यांच्या चौकशीची मान्यता दिल्यास चौकशी समितीची स्थापना होऊ शकते. बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर अंमली पदार्थांचा मुद्दा जोरदार चर्चेत आला होता. यानंतर समीर वानखेडे यांनी बॉलिवूड आणि डग्ज कनेक्शन कारवाईचा धडाका सुरू केला होता. यावेळी त्यांनी अनेक मोठ्या सेलिब्रिटींना चौकशीसाठी एनसीबी कार्यलयात बोलावले होते.
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला समीर वानखेडे यांनी कॉर्डिलिया क्रुझवर केलेल्या कारवाईत अटक केली होती. आर्यन खान याच्याकडे ड्रग्ज सापडल्याचे सांगत एनसीबीने त्याला अटक केली होती. त्यामुळे आर्यन खानला बरेच दिवस तुरुंगात राहावे लागले. या प्रकणातून आर्यन खानला सोडण्यासाठी वानखेडे यांनी २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचाही आरोप झाला होता. या प्ररणामुळेही समीर वानखेडे चर्चेत आले होते. त्यावेळी महाविकास आघाडीमधील मंत्री असताना नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्यावर आरोप केले होते.