मुंबई : एनसीबी (नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो) चे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना जात पडताळणी समितीने क्लीन चिट दिली आहे. जन्माने ते मुस्लिम नसून महार असल्याचा स्पष्ट निर्वाळा समितीने दिला आहे. याप्रकरणी निवाडा देताना वानखेडे यांनी समितीला दिलेले जात प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात आले आहे.
गेल्या वर्षी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्या धर्मासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. समीर यांचे वडील ज्ञानेश्वर वानखेडे यांनी मुस्लिम धर्म स्वीकारत लग्न केल्याचा दावा करतानाच, समीर हे जन्माने मुस्लिम असल्याचा दावादेखील मलिक यांनी केला होता. यानंतर हे प्रकरण जात पडताळणी समितीसमोर गेले होते.
दोन्ही पक्षांना अनुषंगिक कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले होते. वर्षभरानंतर आता समितीने वानखेडे यांना क्लीन चिट दिली आहे. समीर आणि त्यांच्या वडिलांनी हिंदू धर्म सोडलेला नाही, तसेच मुस्लिम धर्मही स्वीकारलेला नाही. ते जातीने महार आहेत, असे समितीने ९१ पानी निकालपत्रात स्पष्ट केले आहे. या निकालानंतर वानखेडे यांनी सत्यमेव जयते, असे ट्विट केले.