समीर वानखेडे अल्पवयीन असताना दारूविक्रीचा परवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2021 07:22 AM2021-11-20T07:22:31+5:302021-11-20T09:22:06+5:30
सरकारपासून माहिती लपविल्याचा नवाब मलिक यांचा वानखेडेंवर नवा आरोप
विशेष प्रतिनिधी
मुंबई : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडे पिता-पुत्राविरुद्ध शुक्रवारी पत्रपरिषदेत पुन्हा नवा आरोप केला. समीर वानखेडे हे १७ वर्षे, १० महिने, १९ दिवसांचे असताना त्यांना उत्पादन शुल्क खात्यातून दारू विक्रीचा परवाना मिळाला.
आजतागायत तो कायम आहे. नोकरीदरम्यान समीर यांनी ही महत्त्वपूर्ण माहिती शासनापासून लपवून ठेवली, असा गाैप्यस्फोट त्यांनी केला. समीर यांचे वडील दाऊद वानखेडे हे उत्पादन शुल्क विभागात नोकरीला होते. पदाचा गैरवापर करून त्यांनी सन १९९७ अल्पवयीन मुलाच्या (समीर) नावे दारूविक्रीचा परवाना मिळवून घेतला. त्या तारखेपासून आजपर्यंत हा परवाना नियमितपणे नूतनीकरण करून उपयोगात आणला जातो आहे. शेवटच्या नूतनीकरणादरम्यान ३,१७,६५० रुपये अदा करण्यात आले.
एनसीबीचे विभागीय प्रमुख समीर वानखेडे यांच्या नावे नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत असलेल्या बारचा आर्थिक व्यवहार त्यांचे वडील पाहतात. दोन दिवसापूर्वी ते या ठिकाणी येऊन गेल्याची माहिती कर्मचाऱ्यांकडून मिळाली. त्यांच्या वडिलांनी पोलीस खात्यात असताना मुलाच्या नावाने हा बार सुरू केला होता. तेव्हा समीर अल्पवयीन असल्याचा आरोप होत असल्याने वयाची पडताळणी न करता या बारला परवाना देणाऱ्या उत्पादन शुल्क विभागाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनाही चौकशीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
समीर यांचे वडील पोलीस खात्यात असताना बारचा व्यवहार त्यांच्या वतीने आई पाहत असे. मात्र, पोलीस खात्यातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी स्वतः बार सांभाळण्यास सुरुवात केली. बारचा व्यवसाय परवाना काढण्यासाठी परवानाधारक सज्ञान असावा, अशी अट असतानाही अल्पवयीन असलेल्या समीर यांच्या नावे परवाना मिळालाच कसा, असा प्रश्न उत्पादनशुल्क खात्यात चर्चिला जात आहे. नेमके कुणी वजन खर्ची घातले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. बार समीर वानखेडे यांच्या नावे असला, तरीही ते येथे फारसे फिरकत नसल्याचे बारचे मॅनेजर दिनेश शेट्टी यांनी सांगितले.
बारचे अधिकार वडिलांकडे - वानखेडे
nमलिक यांनी उल्लेख केलेले ते फक्त बार नसून फॅमिली रेस्टारंट ॲण्ड बार आहे आणि त्याचे अधिकार वडिलांकडे असल्याचे समीर वानखेडे म्हणाले.
मी १५ वर्षांचा असताना आईने घर विकून जागा विकत घेत हॉटेल सुरू केले. पुढे शिक्षणाबरोबर आईला हॉटेल कामात मदत केली. २०१५ मध्ये आईच्या
निधनानंतर वडिलांकडे सर्व जबाबदारी दिली. त्यानंतर सगळे तेच पाहतात, असेही त्यांनी नमूद केले आहे.