Join us

Nawab Malik: NCB अधिकाऱ्यावर आरोप करताना नवाब मलिकांकडून झाली चूक; सगळ्यांसमोर दिली कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2021 11:56 AM

नवाब मलिकांनी(Nawab Malik) आजच्या पत्रकार परिषदेत NCB च्या चांडाळ चौकडीवर कारवाई करा अशी मागणी केली आहे.

मुंबई – आर्यन खान(Aryan Khan) ड्रग्स प्रकरणात NCB अधिकारी समीर वानखेडे(Sameer Wankhede) यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडणाऱ्या नवाब मलिकांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत हल्लाबोल केला आहे. आर्यन खानचं अपहरण करुन शाहरुख खानकडून वसुली करण्यामागे मास्टर माईंड मोहित भारतीय आहे असा आरोप मलिकांनी केला. मोहित समीर वानखेडेचा पार्टनर आहे. त्याचसोबत सुनील पाटीलशी काहीही संबंध नसल्याचा खुलासा मलिकांनी आजच्या पत्रकार परिषदेत केला.

नवाब मलिकांनी(Nawab Malik) आजच्या पत्रकार परिषदेत NCB च्या चांडाळ चौकडीवर जोरदार निशाणा साधला. या चांडाळ चौकडीविरोधात आपली लढाई असल्याचं मलिक म्हणाले. या चांडाळ चौकडीत समीर वानखेडे, आशीष रंजन, व्ही.व्ही सिंह आणि ड्रायव्हर माने यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच या पत्रकार परिषेदत मलिकांनी मागे केलेल्या एका चुकीची कबुली दिली. काही दिवसांपूर्वी मलिकांनी व्ही.व्ही सिंह नावाच्या अधिकाऱ्याने जावायाला लँड क्रूझर गाडी मागितल्याचा आरोप केला होता. परंतु याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण देत व्ही.व्ही सिंग यांनी नव्हे तर आशीष रंजन या अधिकाऱ्याने जावायाला गाडी मागितल्याचं कबूल केले. माझी लढाई NCB विरोधात नाही. पण चुकीच्या आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठिशी घालू नये असं आवाहन मलिकांनी केले आहे.

मोहित भारतीय आणि समीर वानखेडे यांची भेट

६ ऑक्टोबरला माझी पत्रकार परिषद झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ७ तारखेला ओशिवरा कब्रस्तानच्या बाहेर समीर वानखेडे आणि मोहित भारतीय एकमेकांना भेटले. या भेटीनंतर वानखेडे घाबरलेले होते. त्यांनी पोलीस ठाण्यात कुणीतरी पाठलाग करत असल्याची तक्रार केली. या दोघांचे नशीब चांगले आहे. त्या भेटीच्या ठिकाणी लागलेले सीसीटीव्ही बंद होते अन्यथा ते फुटेज मिळाले असते. समीर वानखेडे हे मोठ्या सेलिब्रेटींकडून वसुली करायचे. NCB च्या या चांडाळ चौकडीला तात्काळ काढलं पाहिजे अशी मागणी मलिकांनी केली.

सुनील पाटीलचा NCP शी संबंध नाही

माझ्या आयुष्यात मी सुनील पाटीलला कधी भेटलो नाही. सुनील पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य नाही. सुनील पाटीलचे अमित शाहसोबत फोटो आहेत. गुजरातच्या मंत्र्यांसोबत फोटो आहेत. आम्ही फोटोवर आरोप लावत नाही. सुनील पाटील हादेखील समीर वानखेडेच्या प्रायव्हेट आर्मीचा खेळाडू आहे. मी ६ तारखेला पत्रकार परिषद घेतली त्यानंतर २ तासाने मला सुनील पाटीलचा फोन आला. मला आणखी काही माहिती द्यायची असल्याचं सांगितलं. तेव्हा मी त्याला मुंबईत यायला सांगितले परंतु तो आला नाही. त्याला पोलिसांसमोर येऊन सत्य सांगायला बोललो तेव्हा तो गुजरातमध्ये असल्याचं म्हणाला. अद्याप सुनील पाटील समोर आला नाही असंही नवाब मलिकांनी खुलासा केला. मोहित भारतीय यांनी नवाब मलिकांना सुनील पाटील कोण असा प्रश्न केला होता. त्यावर मलिकांनी स्पष्टीकरण दिले.

टॅग्स :नवाब मलिकनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो