Kranti Redkar PC: “आजच्या महिला पुढारलेल्या पण नवाब मलिकांचे आरोप बायकांच्या चोमडेपणासारखे”; क्रांती रेडकरचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 01:42 PM2021-10-26T13:42:00+5:302021-10-26T13:44:19+5:30
Nawab Malik vs Sameer Wankhede: तुम्ही रिस्पेक्टेड पर्सनॅलिटी आहात. पण आमच्या कुटुंबाबद्दल वाट्टेल ते लिहा, आया-बहिणींबद्दल लिहा. हे कोण करायला सांगतंय, हे ट्रोलर्स, पीआर एजन्सी कोण आहे हे शोधा असं अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी म्हटलं आहे.
मुंबई – नवाब मलिक(Nawab Malik) यांच्याकडे काही माहिती असेल तर त्यांनी कोर्टात जावं. माध्यमांसमोर येऊन असे चुकीचे आरोप करणं योग्य नाही. अत्यंत खालच्या पातळीचं राजकारण सुरु आहे. ही चाळीतली भांडणं आहे. १५ वर्ष ज्या माणसानं नोकरी केली त्याच्यावर एकही डाग नाही. अचानक आज उठून आरोप केले जातात. निनावी पत्रावर कुणाचं नाव नाही. छातीठोकपणे पुढे येऊन आरोप करावेत. आजच्या महिला पुढारलेल्या आहेत परंतु नवाब मलिक बायकांच्या चोमडेपणासारखे आरोप करतायेत अशा शब्दात NCB अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी टोला लगावला आहे.
क्रांती रेडकर(Kranti Redkar) यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं की, समीर वानखेडे जर पदावरुन हटले तर त्याचा फायदा कुणाला? वानखेडेंमुळे अनेकांचे नुकसान होत असेल. त्यामुळे कदाचित अशाप्रकारे आरोप करून त्यांना या पदावरुन हटवावं यासाठी हे सुरु आहे अशी शंका वाटते. सोशल मीडियावर ट्रोलिंग करण्यासाठी एजेन्सीला नेमलं आहे. मात्र सत्यमेव जयते. आम्हाला येणाऱ्या धमक्यांचे स्क्रिनशॉट्स काढले आहेत. बर्थ सर्टिफिकेटही दिलं, रिलिजन, कास्टचे प्रूफ दिलेत तर अजून काय देऊ? लवकरच आम्हाला धमक्या देणाऱ्यांबद्दल तक्रार करणार आहोत असं म्हणाल्या.
तसेच तुम्ही रिस्पेक्टेड पर्सनॅलिटी आहात. पण आमच्या कुटुंबाबद्दल वाट्टेल ते लिहा, आया-बहिणींबद्दल लिहा. हे कोण करायला सांगतंय, हे ट्रोलर्स, पीआर एजन्सी कोण आहे हे शोधा. नवाब मलिकांच्या मागे ड्रग्ज पॅडलर्सची मोठी लॉबी असू शकते. जर त्यांच्याकडे माहिती असेल पुरावे असतील तर कोर्टात जावं, मीडिया ट्रायल करून काय साध्य करायचं आहे. बिनबुडाचे आरोप करुन बदनाम करण्याचं काम नवाब मलिकांनी केले. बायकाही असं वागत नाहीत. किचनमधला चोमडेपणा. किचन पॉलिटिक्स. मालदिव्समध्ये कोण बॉलिवूड सेलिब्रिटी होते, ते सांगा असंही क्रांती रेडकर म्हणाल्या.
काय म्हणाले होते नवाब मलिक?
समीर वानखेडेंच्या वडिलांनी मुस्लिम धर्म स्वीकारला. मात्र समीर वानखेडेंनी बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळवली. ही फसवणूक आहे. समीर वानखेडेंवर केलेल्या आरोपांवर मी ठाम आहे. त्यांनी माझ्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल करावा. मी कोर्टाच्या कार्यवाहीला सामोरं जाण्यास तयार आहे, असं नवाब मलिक पत्रकार परिषदेत म्हणाले. वानखेडेंनी अनेक बड्या लोकांचे फोन टॅप केल्याचा आरोपही त्यांनी केला.
वानखेडे यांच्याविरुद्ध सुरू केलेली लढाई आम्ही अशीच पुढे घेऊन जाणार आहोत, असं मलिक यांनी सांगितलं. मी जो दाखला ट्विट केला आहे तो खरा आहे. जर तुम्ही लक्षपूर्वक दाखला पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की त्यावर नाव वेगळं एका बाजूला लिहिण्यात आलं आहे. समीर वानखेडे जन्मापासून दलित आहेत असं सर्टिफिकेट दिलं. त्याआधारे आत्तापर्यंत नोकरी केली. समीर यांच्या वडिलांनी एका मुस्लिम महिलेसोबत लग्न केलं आणि त्यानंतर ते मुस्लिम म्हणून राहत होते. परंतु नोकरीच्या वेळी त्यांनी आपला दाखला बदलला. त्यांनी वडिलांच्या जातीचा वापर केला. जर मी सादर केलेलं सर्टिफिकेट खोटं आहे तर मग त्यांच्या वडिलांनी किंवा स्वतः वानखेडे यांनी आपलं जन्म प्रमाणपत्र समोर आणावं, असं आव्हान मलिक यांनी दिलं.