मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडेंच्या अडचणी वाढल्या आहेत. वानखेडेंचा पहिला निकाह लावणाऱ्या मौलाना मुझम्मील अहमद यांनी केलेल्या दाव्यांमुळे प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. निकाहावेळी समीर वानखेडे आणि शबाना दोघेही मुस्लिम होते. समीर मुस्लिम नसते, तर मी त्यांचा निकाह लावलाच नसता, असा दावा त्यांनी केला आहे.
२००६ मध्ये समीर आणि शबाना यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. त्यावेळी समीर यांनी आपण मुस्लिम असल्याचं सांगितलं होतं, अशी माहिती मौलाना मुझम्मील अहमद यांनी दिली. मंत्री नवाब मलिक यांनी शेअर केलेला निकाहनामा खरा असल्याचंदेखील मौलानांनी म्हटलं आहे. 'त्यावेळी मी निकाह लावला होता. निकाहनामा अगदी योग्य आहे. त्यावेळी समीर, शबाना (समीर यांची पहिली पत्नी), त्याचे वडील सगळे मुस्लिम होते. समीर हिंदू असते, तर निकाहचा झाला नसता. कारण शरियतनुसार असा निकाह होत नाही. शरियतविरोधात जाऊन काझी निकाह लावत नाही. आज समीर काहीही सांगत असले, तरीही त्यावेळी ते मुस्लिमच होते,' असा दावा मौलाना मुझम्मील अहमद यांनी केला.
२००६ मध्ये समीर आणि शबाना यांचा निकाह झाला. त्यावेळी जवळपास २ हजार जण उपस्थित होते. यामध्ये अनेक हायप्रोफाईल व्यक्ती होत्या. संपूर्ण व्यवस्था झाल्यावर मी निकाहासाठी पोहोचलो आणि १५ मिनिटांत निकाहनामा वाचला. समीर यांचा निकाह पूर्णपणे इस्लामिक पद्धतीनं झाला, अशी माहिती अहमद यांनी दिली. समीर आणि शबाना यांचा निकाहनामा आज सकाळीच मंत्री नवाब मलिक यांनी ट्विटरवर शेअर केला. '२००६ मध्ये ७ डिसेंबरला गुरुवारी रात्री ८ वाजता दाऊद वानखेडे आणि शबाना कुरेशी यांचा निकाह झाला होता. मुंबईतील अंधेरी पश्चिमेतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये निकाह संपन्न झाला होता,' असं मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.