लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कॉर्डिलिया क्रूझवर पोलिसांनी जप्त केलेले ड्रग्ज सापडल्याचा खळबळजनक आरोप रिट याचिकेद्वारे करण्यात आला आहे. या याचिकेच्या माध्यमातून आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी एनसीबी मुंबईचे माजी झोनल संचालक समीर वानखेडे यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी आपलीही साक्ष नोंदविण्याचे आदेश सीबीआयला द्यावेत, अशी मागणी केली आहे.
एनसीबी जप्त करत असलेले ड्रग्ज बॅलार्ड पियरच्या तत्कालीन अतिरिक्त महानगर दंडाधिकारींच्या ताब्यात असायचे. मात्र, ते दंडाधिकारी त्यांच्या ताब्यातील ड्रग्ज ओळखीच्या सेलिब्रिटींना विकत व कॉर्डिलिया क्रूझवर याच दंडाधिकारींच्या ताब्यात असलेले ड्रग्ज सापडल्याचा आरोप तिरोडकर यांनी केला आहे.
प्रतिज्ञापत्र सादर करा
न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. गौरी गोडसे यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी होती. खंडपीठाने सीबीआयचे वकील हितेन वेणेगावकर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी याचिकेच्या वैधतेवर शंका उपस्थित केली. तिरोडकर यांनी केलेल्या आरोपाबाबत त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र घ्यावे, अशी सूचना वेणेगावकर यांनी न्यायालयाला केली. न्यायालयानेही ती मान्य केली.