मुंबई-
राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याकडून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर सुरू असलेल्या आरोपांच्या फैरी अजूनही सुरूच आहेत. आज नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा ट्विटरच्या माध्यमातून समीर वानखेडे यांच्यावर आणखी एक खळबळजनक आरोप केला. समीर वानखेडे यांची मेहुणी म्हणजेच अभिनेत्री क्रांती रेडकर यांची बहिण ड्रग्ज व्यवसायत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. त्यावर आता समीर वानखेडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. नवाब मलिक उल्लेख करत असलेलं प्रकरण जवळपास १३-१४ वर्ष जुनं आहे. हर्षदा रेडकर यांच्यावर ड्रग्ज प्रकरणात कारवाई झाली तेव्हा माझा आणि क्रांती रेडकर यांचा विवाह देखील झाला नव्हता. तसंच मी त्यावेळी एनसीबीच्या नोकरीतही नव्हतो. मग त्याचा काय संबंध?, असा सवाल उपस्थित करत समीर वानखेडे यांनी मलिकांनी केलेल्या आरोपांची हवाच काढून टाकली आहे.
"माझ्या मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर यांच्या विरुद्ध जानेवारी २००८ साली पुण्यात एक तक्रार दाखल करण्यात आली होती. तेव्हा मी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या सेवेतही नव्हतो. क्रांती रेडकर यांच्यासोबत माझा विवाह २०१७ साली झाला. म्हणजेच ड्रग्ज प्रकरणातील हर्षदा रेडकर यांच्याविरोधातील तक्रारीनंतर तब्बल ९ वर्षांनी. त्यामुळे माझा या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. ही घटना जुनी असून विनाकारण माझं नाव यात जोडलं जात आहे", असं स्पष्टीकरण समीर वानखेडे यांनी दिलं आहे.
काय म्हणाले होते नवाब मलिक? नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंची मेहुणी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर हिची बहीण हर्षदा रेडकर हिच्यावर गंभीर आरोप केले आहेत. समीर दाऊद वानखेडे तुमची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर ही ड्रग्सच्या व्यवसायात गुंतलेला आहे का? असा सवाल नवाब मलिक यांनी विचारला आहे.
यासंदर्भात नवाब मलिक यांनी एक ट्विट केले आहे. त्या ट्विटमध्ये नवाब मलिक यांनी विचारले की, समीर दाऊद वानखेडे, तुमची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर ड्रग्सच्या व्यवसायात सहभागी आहे का? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अवश्य द्यावं लागेल, कारण या प्रकरणातील खटला पुण्यातील कोर्टामध्ये प्रलंबित आहे. तसेच खालील कागदपत्रे त्याचा पुरावा आहे.
आपल्या आरोपांना पुरावा म्हणून नवाब मलिक यांनी काही कागदपत्रे शेअर केली आहेत. त्यामधून हर्षदा दीनानाथ रेडकर हिच्यावर पुण्यातील कोर्टात खटला सुरू असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. आता नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांमुळे वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यात सुरू असलेल्या वादाला नवे वळण लागण्याची शक्यता आहेत.