Join us

Sameer Wankhede: “बदलीच्या फक्त अफवा, मी अद्यापही झोनल डायरेक्टरच; मला तपासापासून हटवलेलं नाही”: समीर वानखेडे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2021 11:38 PM

Sameer Wankhede: मुंबई क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणाचा तपास आता वरिष्ठ पोलिस अधिकारी संजय सिंह यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीकडे सोपवण्यात आला आहे.

मुंबई: बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख (Shah Rukh Khan)  खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाच्या (Aryan Khan Drugs Case) तपासातून एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना हटवण्यात आले आहे. मुंबई क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणाचा तपास आता वरिष्ठ पोलिस अधिकारी संजय सिंह (Sanjay Kumar Singh) यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीकडे सोपवण्यात आला आहे. या एकूण घडामोडींनंतर समीर वानखेडे यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. 

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी सातत्याने समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले होते. यानंतर आता एनसीबीने मोठा निर्णय घेत, वानखेडे यांच्याकडून आर्यन खान ड्रग्स प्रकरणा शिवाय आणखी ५ केसेसचा तपास काढून घेतला आहे. मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणातून समीर वानखेडेची हकालपट्टी केल्यानंतर दिल्ली एनसीबीचे एक पथक उद्या म्हणजेच शनिवारी मुंबईत येत आहे. हे पथक मुंबई झोनमधील आर्यन खान प्रकरणासह इतर ५ अशा ६ प्रकरणांची चौकशी करेल.

मला तपासातून वगळण्यात आलेले नाही

मला तपासातून वगळण्यात आलेले नाही. या प्रकरणाचा तपास कोणत्या तरी केंद्रीय एजन्सीमार्फत व्हावा, अशी माझी न्यायालयात याचिका देखील केली होती. त्यामुळे आर्यन प्रकरण आणि समीर खान प्रकरणाचा तपास दिल्ली एनसीबीची एसआयटी करत आहे. दिल्ली आणि मुंबईच्या एनसीबी संघांमध्ये हा एक समन्वय आहे. माझी बदली झालेली नाही. मी अद्याप झोनल डायरेक्टर पदावर कायम आहे. बदलीच्या फक्त अफवा आहेत. फक्त माझ्याकडील ६ केसेस दिल्लीतील टीमकडे देण्यात आल्या आहेत, असे समीर वानखेडे यांनी स्पष्ट केले आहे. 

कोणत्याही अधिकाऱ्याला त्यांच्या भूमिकेतून हटवले नाही

एनसीबीच्या मुख्यालयाच्या महासंचालकांनी विशेष तपास पथकाची स्थापन करण्यात आलेली आहे. या प्रकरणातील कमतरता आणि पुढचा सखोल तपास करण्यासाठी NCB मुंबई झोनल युनिटकडून एकूण ६ प्रकरणे ताब्यात घेणार आहे. याचा संबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिणामांची आहे. कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा अधिकाऱ्यांना त्यांच्या सध्याच्या भूमिकेतून काढून टाकण्यात आलेले नाही आणि विरुद्ध कोणतेही विशिष्ट आदेश जारी होईपर्यंत ते आवश्यकतेनुसार ऑपरेशन्स शाखेच्या तपासाला मदत करत राहतील. NCB संपूर्ण भारतात एकल एकात्मिक एजन्सी म्हणून कार्य करते, हे पुन्हा एकदा आम्ही नमूद करू इच्छितो, असे या प्रकरणाचे नवे तपास अधिकारी संजय सिंह यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, यानंतर नवाब मलिक यांनी ट्विट करत यावर भाष्य केले आहे. ही फक्त सुरुवात आहे, व्यवस्थेला मुळापासून साफ ​​करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. समीर वानखेडे यांना पाच प्रकरणांमधून काढून टाकण्यात आले आहे. आणखी २६ प्रकरणांचा तपास बाकी आहे, असे मलिक यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :समीर वानखेडेमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टीआर्यन खाननार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो