Sameer Wankhede : समीर वानखेडे ‘धर्म’संकटात! हिंदू की मुस्लीम? वाद कायम, बचावासाठी वडीलही उतरले मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 07:39 AM2021-10-28T07:39:50+5:302021-10-28T07:43:46+5:30

Sameer Wankhede: समीर यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे मुलाच्या बचावासाठी पुढे आले असून त्यांनी आम्ही जन्माने हिंदूच असल्याचे स्पष्ट केलेे आहे. तर त्यांची पत्नी व अभिनेत्री क्रांती रेडकर यांनीही पहिल्या लग्नावेळी समीर हिंदूच होते, असे सांगितले.

Sameer Wankhede: Sameer Wankhede in 'religion' crisis! Hindu or Muslim? The dispute continued, the father also came to the rescue; Qazi says, ... then I would not have got married | Sameer Wankhede : समीर वानखेडे ‘धर्म’संकटात! हिंदू की मुस्लीम? वाद कायम, बचावासाठी वडीलही उतरले मैदानात

Sameer Wankhede : समीर वानखेडे ‘धर्म’संकटात! हिंदू की मुस्लीम? वाद कायम, बचावासाठी वडीलही उतरले मैदानात

Next

मुंबई : ड्रग्ज पार्टी प्रकरणावरून सुरू झालेला वाद आता धर्माच्या मुद्द्यावर येऊन ठेपला आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे हे मुस्लीम असल्याचा दावा अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी केल्यानंतर मौलाना मुझम्मील अहमद यांनी मलिक यांच्या दाव्याला पुष्टी देणारे वक्तव्य केल्याने वानखेडे यांच्यापुढे ‘धर्म’संकट उभे ठाकले आहे. 

दरम्यान, समीर यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे मुलाच्या बचावासाठी पुढे आले असून त्यांनी आम्ही जन्माने हिंदूच असल्याचे स्पष्ट केलेे आहे. तर त्यांची पत्नी व अभिनेत्री क्रांती रेडकर यांनीही पहिल्या लग्नावेळी समीर हिंदूच होते, असे सांगितले. या सर्व पार्श्वभूमीवर बुधवारचा दिवस दाव्या-प्रतिदाव्यांनी गाजला.

नवाब मलिक यांच्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ मौलाना मुझम्मील अहमद यांनी २००६ मध्ये समीर यांच्या पहिल्या निकाहाचा हवाला दिला.  मुझम्मील म्हणाले की, निकाहावेळी समीर वानखेडे आणि शबाना हे दोघेही मुस्लीम होते. समीर मुस्लीम नसते तर त्यांचा निकाहच लावला नसता. कारण शरियतनुसार असा निकाह होत नाही आणि शरियतविरोधात जाऊन काझी निकाह लावत नाहीत.

मी हिंदूच... 
या वादावर उत्तर देताना आपण जन्माने हिंदू असून आताही हिंदूच असल्याचे समीर वानखेडे यांनी स्पष्ट केले. पहिल्या लग्नाविषयी ते म्हणाले की, माझी आई मुस्लीम होती. तिच्या इच्छेनुसार इस्लामी पद्धतीने लग्न केले. आईने वडिलांशी लग्नानंतर हिंदू धर्माचा स्वीकार केला होता. आईच्या इच्छेनुसार इस्लामी पद्धतीने लग्न केल्यानंतर विशेष विवाह कायद्यानुसार विवाह नोंदणी केली म्हणजे काही गुन्हा झाला का, असा प्रश्नही वानखेडे यांनी केला. 

वडील म्हणतात, आम्ही सारे हिंदूच
समीर यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे बचावासाठी पुढे आले. ते म्हणाले, माझे नाव ज्ञानदेवच असून, पत्नी मला लाडाने ‘दाऊद’ असे म्हणत असे. समीर यांचा निकाहनामा खरा आहे, त्यावर माझा ‘दाऊद’ असा उल्लेख चुकीचा आहे. माझ्या बायकोने ते चुकून केले असावे. तिने असे का केले, हे सांगायला ती या जगात नाही. 
मी जन्मापासून हिंदूच असून, ज्ञानदेव कचरू वानखेडे हेच माझे खरे नाव आहे. माझ्या सगळ्या कागदपत्रांवर ते आहे. मी हिंदू एससी जातीचा आहे. मी जन्मापासून हिंदू असताना मुलगा मुस्लीम कसा असेल, असा सवालही त्यांनी केला. नवाब मलिकांविरोधात ॲट्रॉसिटी व तसेच बदनामीचा दावा दाखल करणार असल्याचेही ते म्हणाले. 

वानखेडेंची साडेचार तास चौकशी
क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी आर्यन खानवरील कारवाई टाळण्यासाठी २५ कोटींची लाच मागितल्याच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर समीर वानखेडे यांची बुधवारी उच्चस्तरीय चौकशी समितीने साडेचार तास चौकशी केली. या प्रकरणातील पंच, साक्षीदार प्रभाकर साईल याने शपथपत्राद्वारे त्यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांच्या अनुषंगाने त्यांचा सविस्तर जबाब नोंदविण्यात आला. 
दरम्यान, वानखेडे यांच्या जीवाला धोका असल्याचे सांगत केंद्रीय गृहमंत्रालयाने वानखेडे यांना झेड प्लस सुरक्षा दिली आहे.

पहिल्या निकाहावेळी समीर हिंदूच : क्रांती रेडकर
समीर यांची पत्नी क्रांती रेडकर त्यांच्या पहिल्या लग्नाविषयी म्हणाल्या की, पहिल्या निकाहावेळी समीर हिंदूच होते. सासूबाईंनीच निकाहनाम्याची कागदपत्रे तयार केली होती. समीर हे कायदेशीरदृष्ट्या तेव्हाही हिंदू होते आणि आताही आहेत. त्यांच्या जात प्रमाणपत्रावर हिंदू धर्म व जात महार असल्याचा उल्लेख आहे. 

...तर राजकारणातून निवृत्ती : नवाब मलिक
अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा निकाहनामा ट्विटरवर शेअर करत, समीर हे मुस्लीम असल्याचा पुनरुच्चार केला. निकाहनामा खोटा असल्यास आपण राजकारणातून कायमची निवृत्ती होऊ, असेही मलिक म्हणाले. समीर वानखेडे यांना मी नोकरीचा राजीनामा देण्यास सांगणार नाही. मात्र, कायद्यानुसार त्यांना नोकरी गमवावी लागेल हे नक्की, असा दावाही मलिक यांनी यावेळी केला. 

Web Title: Sameer Wankhede: Sameer Wankhede in 'religion' crisis! Hindu or Muslim? The dispute continued, the father also came to the rescue; Qazi says, ... then I would not have got married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.