Sameer Wankhede at Siddhivinayak Mandir, Aryan Khan Case: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे सीबीआयच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी आज संध्याकाळी मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. आर्यन खान प्रकरणात सीबीआयने शनिवारी सुमारे 5 तास चौकशी केली. तपास एजन्सीने त्याच्याकडून मुंबईतील कार्यालयात प्रकरणाशी संबंधित प्रत्येक पैलूंवर उत्तरे मागितली आणि लाच घेतल्याच्या आरोपांमध्ये त्याची भूमिका तपासली. चौकशीनंतर समीर वानखेडे सीबीआय कार्यालयातून बाहेर आले तेव्हा त्यांनी माध्यमांच्या प्रश्नांवर ‘सत्यमेव जयते’ म्हणत पुढे निघून गेले. त्यानंतर त्यांनी थेट सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेतले. यासंबंधीचा फोटोही सध्या व्हायरल झाला आहे.
आज सीबीआय चौकशीत काय झालं?
कॉर्डिलिया ड्रग्ज प्रकरणातील सदोष तपास आणि आर्यन खानला सोडण्यासाठी मागितलेल्या २५ कोटी रुपयांच्या खंडणी आरोपावरून समीर वानखेडे यांची सीबीआयने चौकशी केली. यात आता समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सीबीआयने समीर वानखेडे यांना तब्बल ५ तास प्रश्न विचारले. आजच्या चौकशीमध्ये त्यांच्यावर सुमारे १५ ते २० प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली आणि त्यावर स्पष्टीकरण देण्यास सांगितले अशी माहिती आहे.
समीर वानखेडे यांना उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला असून, २२ मे पर्यंत अटक न करण्याचे निर्देश दिले आहेत. यानंतर आता सीबाआयने समीर वानखेडे यांची चौकशी केली. चौकशीनंतर मीडियाने समीर वानखेडे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. मात्र केवळ ‘सत्यमेव जयते’ असे म्हणत निघून गेले. या प्रकरणात सीबीआयने प्रथमच समीर वानखेडेंची चौकशी केली. चौकशीची पुढील तारीख निश्चित झालेली नाही. समीर वानखेडे यांना पुढील चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलेले नाही. सीबीआयने त्याला विचारलेले काही प्रश्न आर्यन खान आणि किरण गोसावी यांच्यातील संबंध आणि छापेमारीच्या माहितीशी संबंधित होते, असे सांगितले जात आहे.