मुंबई: क्रूझ शिपवरील ड्रग्ज पार्टीवर (Cruise Ship Drugs Party) छापा टाकून शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) अटक करणारे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) सध्या वादात सापडले आहेत. समीर वानखेडेंनी मुस्लिम धर्म स्वीकारला. त्यांनी एका मुस्लिम तरुणीशी विवाहदेखील केला. मात्र नोकरी मिळवण्यासाठी त्यांनी दलित असल्याच्या प्रमाणपत्राचा वापर केला, असा खळबळजनक आरोप मंत्री नवाब मलिक यांनी केला. त्यानंतर आता वानखेडेंच्या पहिल्या पत्नीचे वडील माध्यमांसमोर आले आहेत. त्यांनी केलेल्या दाव्यांमुळे वानखेडेंच्या अडचणी वाढल्या आहेत.
समीर वानखेडेंचं कुटुंब आधी मुस्लिम होतं. ते मुस्लिम नसते, तर त्यांचं आणि माझ्या मुलीचं लग्न झालंच नसतं, असा दावा वानखेडेंच्या पहिल्या पत्नीचे वडील डॉ. जाहीद कुरेशी यांनी केला. समीर वानखेडेंचं कुटुंब पूर्वी मुस्लिम होतं. माझी मुलगी शबाना कुरेशीसोबत त्यांचा विवाह मुस्लिम धर्माच्या रितीरिवाजानुसार संपन्न झाला होता. समीर वानखेडेच्या वडिलांचे नाव दाऊद होतं. समीरच्या बहिणीचंही लग्न मुस्लिम कुटुंबात झालं आहे, असं डॉ. जाहीद यांनी सांगितलं.
समीर वानखेडेंचं कुटुंब हिंदू होतं याबद्दल आम्हाला कोणतीही कल्पना नव्हती. हे प्रकरण माध्यमांमध्ये आलं, तेव्हा आम्हाला ही गोष्ट समजली. समीर यांची आई खूप चांगली होती. त्यांच्याशी आमचे खूप चांगले संबंध होते, असं जाहीद म्हणाले. आम्हाला या प्रकरणात अधिक काही बोलायचं नाही. समीर वानखेडे हिंदू असताना त्यांच्याशी मुलीचं लग्न कसं लावलंत अशी विचारणा होत असल्यानं मी आमची बाजू मांडत आहे, असं म्हणत जाहीद कुरेशी यांनी वानखेडेंबद्दल अधिक भाष्य करण्यास नकार दिला.
निकाह लावणारे काझी काय म्हणाले?२००६ मध्ये समीर आणि शबाना यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. त्यावेळी समीर यांनी आपण मुस्लिम असल्याचं सांगितलं होतं, अशी माहिती मौलाना मुझम्मील अहमद यांनी दिली. मंत्री नवाब मलिक यांनी शेअर केलेला निकाहनामा खरा असल्याचंदेखील मौलानांनी म्हटलं आहे. 'त्यावेळी मी निकाह लावला होता. निकाहनामा अगदी योग्य आहे. त्यावेळी समीर, शबाना (समीर यांची पहिली पत्नी), त्याचे वडील सगळे मुस्लिम होते. समीर हिंदू असते, तर निकाहचा झाला नसता. कारण शरियतनुसार असा निकाह होत नाही. शरियतविरोधात जाऊन काझी निकाह लावत नाही. आज समीर काहीही सांगत असले, तरीही त्यावेळी ते मुस्लिमच होते,' असा दावा मौलाना मुझम्मील अहमद यांनी केला.