Sameer Wankhede : समीर वानखेडेंची राज्य सरकारच्या जात पडताळणी समितीकडून चौकशी होणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 08:04 PM2021-11-30T20:04:30+5:302021-11-30T20:06:31+5:30
Sameer Wankhede : सामाजिक कार्यकर्ते अशोक कांबळे यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचा जात प्रमाणपत्र खोटे असल्याची तक्रार केली आहे.
मुंबई : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत असलेल्या जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे खोटे जात प्रमाणपत्र असल्याची तक्रार एका तक्रारदारकाडून करण्यात आली आहे. यासंदर्भात आज तक्रारदाराला समितीने कागदपत्रे घेऊन कार्यालयात बोलविले होते. त्यानुसार, तक्रारदार अशोक कांबळे यांचे वकील हे कागदपत्रे घेऊन कार्यालयात पोहोचले होते. तक्रारदाराने कागदपत्र सादर केली, त्यानुसार प्रथम दर्शनीय समितीने या तक्रारीची गंभीर दखल घेत तक्रारदार व समीर वानखेडे या दोघांनाही पुढील चौकशीसाठी बोलावले आहे.
सामाजिक कार्यकर्ते अशोक कांबळे यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचा जात प्रमाणपत्र खोटे असल्याची तक्रार केली आहे व त्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यानुसार आज अशोक कांबळे यांच्या वकिलांनी कागदपत्रे समितीला सादर केली. तक्रारदार अशोक कांबळे यांचे वकील नितीन सातपुते हे जाती प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयात आज उपस्थित होते.
यावेळी त्यांनी सर्व कागदपत्रे समितीला दिल्याचे सांगितले. तसेच, प्रथम दर्शनी समितीने कागदपत्रे पाहून चौकशी करण्याचे मान्य केले. त्यानुसार पुढील 14 डिसेंबरला समीर वानखेडे यांना कार्यलयात बोलावून कागदपत्रे सादर करण्याचे आदेश देऊ, असे समितीने सांगितल्याचे वकील सातपुते यांनी सांगितले. याचबरोबर, आम्ही दिलेल्या तक्रारीनुसार कागदपत्रे जर खोटी आढळली तर त्यांच्यावर कारवाई होऊन त्यांची नोकरी देखील जाईल, असेही सातपुते यांनी म्हटले आहे.
समीर वानखेडेंची जात पडताळणी समितीकडून चौकशी होणार!https://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/mGu9YPM5cR
— Lokmat (@lokmat) November 30, 2021
समीर वानखेडेंवर नवाब मलिकांचा आरोप
दरम्यान, गेल्या काही दिवसांत मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणावरून राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे समीर वानखेडे यांच्यात आरोप-प्रत्यारोप होताना दिसून आले. समीर वानखेडे हे भ्रष्टाचारी आणि खंडणीखोर अधिकारी असून त्यांनी अनेक निर्दोष लोकांना खोट्या ड्रग्ज प्रकरणात अडकवल्याचा नवाब मलिक यांचा दावा आहे. तसेच, समीर वानखेडे हे जन्माने मुस्लीम आहेत आणि त्यांनी बोगस जात प्रमाणपत्र सादर करून मागासवर्गीयांच्या आरक्षणात घुसखोरी केली व सरकारी नोकरी मिळवली, असाही दावा नवाब मलिक यांनी केला आहे.