मुंबई - आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना टार्गेट केलंय. त्यामुळे, याप्रकरणावरुन गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकारण चांगलेच तापलेले दिसत आहे. मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. समीर वानखेडेंच्या पोस्टींगबद्दल मलिक यांनी आरोप केले होते. आता, एनसीबीने हे आरोप फेटाळले असून प्रेसनोट जारी केली आहे. दरम्यान, मलिक यांच्या आरोपावर, एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनीही सांगितले की, नवाब मलिक खोटारडे आहेत आणि वानखेडे मालिकांवर याप्रकरणी कायदेशीर कारवाई करतील.
पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये सभेत बोलताना मलिक यांनी समीर वानखेडेंचा एकेरी उल्लेख करत टीका केली. सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर समीर वानखेडे यांची एनसीबीमध्ये बदली करण्यात आली आणि लगेच रिया चक्रवर्ती हिला अटक करण्यात आली. ४-४ हजार रुपयांच्या पेमेंटच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आला. व्हॉटस्ॲप चॅटच्या माध्यमातून अभिनेत्री व अभिनेत्यांना एनसीबीच्या दारात उभे करण्यात आले व दहशत निर्माण करण्याचे काम झाले असे सांगतानाच ही सर्व वसुली मालदीव व दुबईमध्ये झालीय असा थेट आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. आता, एनसीबीने पत्रक जारी करत याचं स्पष्टीकरण दिलंय. वानखेडे यांच्या मुंबईसाठी बदलीच्या अर्जाबाबतचंही एनसीबीने सांगितलंय.
समीर वानखेडे मालदीवला का गेले?
समीर वानखेडे आणि त्यांच्या बहिणीने मालदीव आणि दुबईमध्ये बॉलिवूड कलाकारांकडून वसुली केली, असा आरोप मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक म्हणाले की, कोरोना काळात संपूर्ण फिल्मइंडस्ट्री मालदीव आणि दुबईमध्ये होती. त्यावेळी समीर वानखेडे यांच्या परिवारातील लोकही तिकडे उपस्थित होते. समीर वानखेडे दुबई, मालदीवमध्ये होते का? त्यांची लेडी डॉन मालदीवमध्ये गेली होती का? याचं उत्तर मिळणं अपेक्षित आहे, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.
वानखेडेच तुरुंगात जातील - मलिक
समीर वानखेडेचा बाप बोगस, तो स्वतः बोगस तसेच त्याच्या घरातले बोगस आहेत, असं वक्तव्य मलिक यांनी सभेत केलं. येत्या वर्षभरात त्याची (समीर वानखेडे) नोकरी जाईल, बोगसगिरीचे पुरावे सादर केल्यानंतर तो एक दिवसही नोकरीत राहू शकत नाही. आगामी काळात त्याचा तुरुंगवास निश्चित आहे. आम्हाला तुरुंगात टाकण्यासाठी पुढे आलेल्या समीर वानखेडेचा तुरुंगवास या देशातील जनता पाहील, असे मलिक यांनी म्हटले होते.