मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणारा आरोपी समित ठक्कर याच्या पोलीस कोठडीत २ नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर, आज उच्च न्यायालयातील सुनावणीत समित ठक्करला जामीन मंजूर करण्यात आला आहे. नागपूरच्या खंडपीठाने अटी व शर्तींसह हा जामीन मंजूर केला आहे.
आरोपी समित प्रॉपर्टी डीलर असून त्याचे वडील वाहतूक व्यावसायिक आहेत. सोशल मीडियावर आक्रमकपणे सक्रिय राहणाऱ्या समितने ऑगस्टमध्ये ट्विटरवर सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते खासदार राऊत यांच्याविरोधात अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. सीताबर्डी पोलिसांनी समित ठक्करविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. तो राजकोट (गुजरात)ला पळून गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्याचे लोकेशन ट्रेस करून सीताबर्डी पोलिसांचे एक पथक राजकोटला पोहोचले. तेथे त्याच्या मुसक्या बांधून ठक्करला २६ ऑक्टोबरला नागपुरात आणण्यात आले होते. सोमवारी न्यायालयाने ठक्करला ३० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. त्यानंतर, 2 नोव्हेंबरपर्यंत ती वाढविण्यात आली होती.
डोके भडकावणारे कोण?ठक्कर याने ऑगस्टमध्ये तीन वेगवेगळे ट्विट केले आहेत. आरोपीचे सोशल मीडियावरील फाॅलोअर्स बघता त्याला यात आणखी कुणी मदत केली, कुणी डोके भडकविले, राजकोटला त्याला कुणी आश्रय दिला, या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधणार आहेत.