'मी सत्य समोर आणण्याचा प्रयत्न करतोय'; पंच प्रभाकर साईल यांची स्पष्टोक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 01:39 PM2021-10-26T13:39:30+5:302021-10-26T13:41:02+5:30
प्रभाकर साईलने रविवारी एक व्हिडिओ जाहीर करत 25 कोटींच्या तोडपाणीबाबत मोठा गौप्यस्फोट केला होता.
मुंबई- गोवा क्रुझ पार्टीमधील पंच प्रभाकर साईळ यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी महत्वाची माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, ''मी सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न करतोय,''असे ते म्हणाले. तसेच, संध्याकाळी या प्रकरणावर सविस्तर बोलणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, यापू्र्वी प्रभाकर साईल यांनी त्यांच्या जीवाला धोका असल्यानं पोलिस संरक्षण देण्याची मागणी मुंबई पोलिस आयुक्तांकडे केली. त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी साईल यांच्या मागणीनुसार त्यांना पोलीस संरक्षण दिल्याचं सांगितलं आहे.
मुंबई क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात किरण गोसावीचा बॉडीगार्ड म्हणून काम करणाऱ्या प्रभाकर साईलने रविवारी एक व्हिडिओ जाहीर करत 25 कोटींच्या तोडपाणीबाबत मोठा गौप्यस्फोट केला होता. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी कोऱ्या कागदावर पंच म्हणून स्वाक्षरी घेतल्या तसेच, आर्यन खानला सोडण्यासाठी मध्यस्थातर्फे 25 कोटी रुपयांची मागणी कारण्याबाबतचं संभाषण ऐकल्याचा दावाही साईल यांनी केला होता.
मलिकांच्या आरोपांवर क्रांती रेडकरचे स्पष्टीकरण
नवाब मलिक यांनी केलेल्या बेछूट आरोपांना आता समीर वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. असं निनावी पत्र कुणीही लिहू शकतं. पत्र लिहिणाऱ्याने समोर येऊन आरोप करावेत, असे आव्हानही क्रांती रेडकर म्हणाल्या. पत्रकार परिषदेमध्ये नवाब मलिक यांनी प्रसिद्ध केलेल्या निनावी पत्राबाबत क्रांती रेडकर म्हणाल्या की, समीर वानखेडेवर करण्यात आलेले आरोप खोटे आहे. अशा प्रकारचं निनावी पत्र कुणीही पाठवू शकतो. ज्या पत्रावर कुणाचेही नाव नाही, कुणीही जबाबदारी घेत नाही, अशा पत्रावर आणखी काय बोलणार, आरोप करणाऱ्यांकडे पुरावे असतील तर त्यांनी ते सादर करावेत, असे आव्हान क्रांती रेडकर यांनी नवाब मलिक यांना दिले.
मलिकांचा गौप्यस्फोट
आज सकाळी नवाब मलिक यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याबाबत अत्यंत खळबळजनक गौप्यस्फोट केला होता. समीर वानखेडेंच्या कारवायांबाबत एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने नाव न प्रसिद्ध करता पाठवलेले पत्र प्रसिद्ध करत नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंनी केलेल्या 26 कारवायांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गंभीर आरोप केला होता.