लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई येथे ३ कावळे, ठाणे येथे १५ बगळे व २ पोपट या पक्ष्यांचे तसेच परभणी येथे एका कुक्कुटपालन फार्ममधील ८०० पक्ष्यांचे, दापोली येथे ६ कावळे व बीड येथे ११ कावळ्यांचे मृत्यू झाले. त्यांचे नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील निशाद प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. या तपासणीचे निष्कर्ष हाती येण्यास ४८ ते ७२ तास लागू शकतात.
कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरित होणाऱ्या पक्षी मृत झाल्याचे आढळून आल्यास किंवा व्यावसायिक पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांमध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मृत झाल्याचे निदर्शनास आल्यास, नजीकच्या पशू वैद्यकीय दवाखान्यामध्ये याची माहिती द्यावी. पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोल फ्री दूरध्वनी क्रमांकावर त्वरित संपर्क करून त्याची माहिती द्यावी. मृत पक्ष्यांना हात लावू नये किंवा शवविच्छेदन करू नये किंवा त्यांची परस्पर विल्हेवाट लावू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
--------------------
बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवण्यात येऊ नयेत. काही समस्या असेल तर पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोल फ्री दूरध्वनी क्रमांक १८००२३३०४१८ वर संपर्क साधावा. राज्यात बर्ड फ्लू रोगाचे प्रकरण आढळून आलेले नाही, असे यंत्रणेकडून सांगण्यात आले.