Join us

कोरोना रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुण्यात, ‘कस्तुरबा’ऐवजी ‘एनआयव्ही’ प्रयोगशाळेत पाठविणार

By संतोष आंधळे | Published: December 23, 2022 8:50 AM

कोरोनाकाळात गेल्या वर्षी कस्तुरबा रुग्णालयात महापालिकेने स्वतःची जीनोम सिक्वेन्सिंग सेवा उपलब्ध असलेली अत्याधुनिक प्रयोग शाळा उभारली होती.

मुंबई : केंद्रीय आरोग्य विभागाने कोरोनाच्या अनुषंगाने जारी केलेल्या निर्देशांनंतर राज्याच्या आरोग्य विभागाने सर्व महापालिकांना पॉझिटिव्ह रुग्णांच्या नमुन्यांची जनुकीय क्रमनिर्धारण तपासणी (जीनोम सिक्वेन्सिंग) करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, मुंबई महपालिकेचा आरोग्य विभाग शहरातील नमुने कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळेऐवजी पुणे येथील एनआयव्ही या प्रयोगशाळेत पाठविणार आहे.कोरोनाकाळात गेल्या वर्षी कस्तुरबा रुग्णालयात महापालिकेने स्वतःची जीनोम सिक्वेन्सिंग सेवा उपलब्ध असलेली अत्याधुनिक प्रयोग शाळा उभारली होती. ज्यावेळी मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्ण सापडत होते. त्यावेळी याच प्रयोगशाळेत नमुन्यांचे  जीनोम सिक्वेन्सिंग केले जात होते. याप्रकरणी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले की, ‘सध्या मुंबईत  फार कमी प्रमाणात कोरोनाचे रुग्ण पॉझिटिव्ह सापडत आहेत. जीनोम सिक्वेन्सिंग ज्या यंत्राद्वारे केले जाते त्याच्या प्रत्येक सायकलसाठी अंदाजे किमान ३६० किंवा ३७५ नमुने लागतात. मात्र, कोरोनाच्या संसर्गाचा दर फारच कमी असून ५-६ बाधित शहरात आढळून येत आहेत. आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार बहुतांश सर्व शहरांतील नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहेत.’

- एका डॉक्टरने दिलेल्या माहितीनुसार, त्यात आणखी एक तांत्रिक मुद्दा असा आहे की, प्रत्येक बाधित रुग्णाचा सीटी व्हॅल्यू ३० पेक्षा कमी आहे. - अशाच नमुन्यांचे जीनोम सिक्वेन्सिंग करावे, असे आदेश आरोग्य विभागाने दिले आहेत. त्यामुळे शहरात आढळून येत असलेल्या कोरोनाबाधितांची सीटी व्हॅल्यू ३० पेक्षा अधिक आहे. ते नमुने तपासणीसाठी पाठवता येत नाहीत.- अशा पद्धतीने ३६० नमुने गोळा होईपर्यंत वाट बघत राहिल्यास कालापव्यय होईल, त्यामुळे नमुने पुण्याला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यापुणे