Join us

जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पालिकेने घेतले नमुने; काेराेना संसर्ग वाढीचा हाेणार अभ्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शहर, उपनगरातील कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढत आहे. मागील काही दिवसांच्या तुलनेत दैनंदिन रुग्णांमध्ये कमालीची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शहर, उपनगरातील कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढत आहे. मागील काही दिवसांच्या तुलनेत दैनंदिन रुग्णांमध्ये कमालीची वाढ झाली असून विविध पातळ्यांवर वैद्यकीय तज्ज्ञांच्या माध्यमातून संसर्ग वाढीचा अभ्यास करण्यात येत आहे. मुंबईत दर दोन ते तीन दिवसांनी ५० रुग्णांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या दृष्टिकोनातून रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांकडेही बारकाईने लक्ष देण्याची सूचना पालिकेने केली आहे.

शहरातील रुग्णसंख्या एका आठवड्यात दुपटीने वाढली असून सोमवारी सतराशे नव्या रुग्णांचे निदान झाले. शहरात एका दिवसात २०० ते ३०० रुग्णांची वाढ यापूर्वी कधीच झालेली नाही. त्यामुळे बाहेरील देशातून उत्परिवर्तित (सजीवांच्या पेशीत असलेल्या जनुकीय माहितीत घडून आलेला बदल) विषाणूचा संसर्ग शहरात झाला आहे का, अशी शंका व्यक्त केली जात आहे. संसर्ग प्रसाराची तीव्रता लक्षात घेता शहरात ब्रिटनमधील उत्परिवर्तित विषाणूचा प्रसार झाला असावा किंवा इतर देशांतील प्रवासी अन्य विमानतळावर उतरून शहरात दाखल झाले असतील. शहरातील विषाणू उत्परिवर्तन झाल्याची शक्यता आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.

* गेल्या महिन्यात पाठवले १०० रुग्णांचे नमुने

गेल्या महिन्यात १०० रुग्णांचे नमुने चाचणीसाठी पाठविले होते. या नमुन्यांच्या माध्यमातून त्यात विषाणू उत्परिवर्तित झाल्याचे दिसून आले नाही. या चाचण्या करण्यासाठी वेळ लागत असल्याने नमुने दिल्यापासून १५ दिवसांनी अहवाल येतात. एकापाठोपाठ एक नमुने गेल्यानंतर उत्परिवर्तित विषाणू असल्यास काही दिवसांनी का होईना, चाचण्यांमधून स्पष्ट होईल, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

-------------------