समृद्धी महामार्गाला संभाजीनगरजवळ भेगा; शहापूरजवळही जोडरस्त्याच्या पुलाला भगदाड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 07:09 AM2024-07-12T07:09:09+5:302024-07-12T07:10:13+5:30

कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह

Samruddhi Highway cracks near Chhatrapati Sambhajinagar | समृद्धी महामार्गाला संभाजीनगरजवळ भेगा; शहापूरजवळही जोडरस्त्याच्या पुलाला भगदाड

समृद्धी महामार्गाला संभाजीनगरजवळ भेगा; शहापूरजवळही जोडरस्त्याच्या पुलाला भगदाड

मुंबई/कसारा : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला छत्रपती संभाजीनगरजवळ ४० मीटर लांबीच्या भेगा पडल्या आहेत, तर शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गावर स्थानिक वाहतूक आणि दोन गावांना जोडणाऱ्या निर्माणाधीन जोडरस्ता पुलाला भगदाड पडल्याचे समोर आले आहे. 

या दोन घटनांमुळे महामार्गाच्या कामाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) कारभारावर टीका केली जात आहे. 

समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा वाहतुकीस खुला करण्यात आल्यानंतर दोन वर्षांच्या आतच छत्रपती संभाजीनगर येथे फतियाबादजवळ मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर मोठ्या भेगा पडल्या . या भेगा ४० मीटर लांब असून, सुमारे ३ एमएम रुंद आहेत. 
दुसरीकडे, शहापूर तालुक्यात याच महामार्गावर स्थानिक वाहतुकीसाठी शेरे-बावघर-शेंद्रूण गावांना जोडण्यासाठी बनवण्यात आलेल्या जोडरस्ता पुलाला मोठे भगदाड पडले आहे. या महामार्गावर कसारा ते आमणे दरम्यानच्या निर्माणाधीन मार्गावर ६८२ किमीवर ओव्हरपासला हा प्रकार घडला आहे. 

दुरुस्तीचे काम तातडीने 

शहापूर भागात मुसळधार पाऊस पडत असल्याने पोच रस्त्याचा भराव वाहून गेल्याने डांबरी भाग एका ठिकाणी खचला. पोच रस्त्याच्या  संरक्षणाचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली. तसेच जोड रस्ता पुलाचे काम पूर्ण झालेले नसल्याने हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नव्हता, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. 

छत्रपती संभाजीनगरजवळील महामार्गाचा पृष्ठभाग सुस्थितीत असून, वाहतुकीस कोणताही धोका नाही. भेग तातडीने भरण्यात आली आहे. कामाचा दोष दायित्व कालावधी  जून २०२६ पर्यंत असून, रस्त्याचा ५० मीटर भाग कंत्राटदार दुरुस्त करणार आहे.
-अनिलकुमार गायकवाड, व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी
 

Web Title: Samruddhi Highway cracks near Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.