समृद्धी महामार्ग : ५० टक्के जमिनीचे भूसंपादन
By अतुल कुलकर्णी | Published: January 17, 2018 04:39 AM2018-01-17T04:39:56+5:302018-01-17T04:40:18+5:30
भाजपा सरकारच्या अत्यंत महत्वाकांक्षी अशाा समृध्दी महामार्गासाठी १० जिल्ह्यातून १५ जानेवारीपर्यंत ५० टक्के जमीन संपादित करण्यात आली आहे.
मुंबई : भाजपा सरकारच्या अत्यंत महत्वाकांक्षी अशाा समृध्दी महामार्गासाठी १० जिल्ह्यातून १५ जानेवारीपर्यंत ५० टक्के जमीन संपादित करण्यात आली आहे. मात्र शेतक-यांनी आक्षेप घेतल्यामुळे अहमदनगर, ठाणे, नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यात भूसंपादनाचे काम रेंगाळले आहे. कोणत्याही परिस्थितीत मार्चच्या आत समृध्दी महामार्गाचे काम सुरु केले जाईल आणि येत्या २० दिवसात आणखी १७ ते २० टक्के भूसंपादन पूर्ण होईल, असे एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी लोकमतशी बोलताना दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यातून २०२.०३ हेक्टर एवढीच जमीन संपादित केली जाणार असून त्यापैकी १६१.३६ हेक्टर जमिनीचे संपादन झाले आहे. दहा जिल्ह्यातून हा मार्ग जाणार असून सगळ्यात जास्त म्हणजे १२४८.४८ हेक्टर जमीन औरंगाबाद जिल्ह्यातून संपादित केली जाणार असून त्यापैकी ५५५.९ हेक्टर जमिनीचेच भूसंपादन आजपर्यंत झालेले आहे.
ज्या नाशिक जिल्ह्यातून या महामार्गाला सर्वाधिक विरोध झाला तेथील ११०३.३९ हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार असून १५ जानेवारीपर्यंत त्यापैकी ४८३.५ हेक्टर जमीन सरकारच्या ताब्यात आली आहे. भू संपादनाचे काम जोरात सुरू असून पावसाळ्याआधी आम्ही मोठ्या प्रमाणावर कामास सुरुवात केलेली असेल, असे मोपलवार यांनी सांगितले.