सोशल मीडियावर संमोहित करून ‘सनातन’ने तरुणांना ओढले जाळ्यात; सीबीआयला शंका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 06:02 AM2018-08-25T06:02:53+5:302018-08-25T06:48:30+5:30
तरुणांचा ‘ब्रेनवॉश’ करणाºया मुख्य सूत्रधारांच्या मागावर तपासयंत्रणा असल्याचे समजते.
औरंगाबाद : सोशल मीडियावर सांप्रदायिक घटनांवर विखारी पोस्ट टाकणाऱ्या तरुणांना संमोहित (हिप्नॉटिझम) करून त्यांना कट्टरवादाच्या दिशेने तयार करण्याचा पॅटर्न ‘सनातन’ राबवत असल्याची माहिती पुढे येत आहे. या तरुणांचा ‘ब्रेनवॉश’ करणाºया मुख्य सूत्रधारांच्या मागावर तपासयंत्रणा असल्याचे समजते.
सीबीआयच्या पथकाने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात सहा जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणीही काही संशयितांचा शहरात शोध सुरू केला आहे. या दोन्ही हत्यांबरोबरच कॉ. गोविंद पानसरे, साहित्यिक प्रा. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येचे कनेक्शन एकमेकांत गुंतले आहे काय, या दिशेने तपास सुरू आहे.
सनातन संस्थेशी संबंधित शरद कळसकर, सचिन अंदुरे, श्रीकांत पांगरकर, रोहित रेगे, नचिकेत इंगळे, अजिंक्य सुरळे या सहा जणांना आजवर सीबीआय व एटीएसच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यापैकी सचिन अंदुरेचे सोशल मीडियातील सर्व कम्युनिकेशन सीबीआयची टीम तपासत आहे. शिवाय उर्वरित पाच जणांशी तसेच इतरांशीही त्याचे काय संभाषण झालेले आहे, याची माहितीही सीबीआयची टीम घेत आहे. सनातनच्या साधकांनी सचिनबरोबर मोबाइलऐवजी लँडलाइनवरून संपर्क केल्याचे समजते. ते संभाषणदेखील सीबीआय तपासत आहे. सचिनला संमोहित करून या गुन्ह्यात ओढल्याचे सीबीआयच्या सूत्रांचे म्हणणे आहे.