मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने राज्य घटनेशी इमान राखत धर्मनिरपेक्षपणे राज्याचा कारभार हाकला नाही. गांधी, नेहरु यांचा वापर त्यांनी वारसा सांगण्यापुरता केला. गांधी, नेहरुंवर काँग्रेसवाल्यांची खरोखरच श्रद्धा असती तर सनातन सारख्या विषारी प्रचार करणाऱ्या संस्थेच्या वेळीच मुसक्या आवळल्या असत्या असे सांगत सनातन संस्था फोफावण्यास काँग्रेस, राष्ट्रवादी जबाबदार आहे, असा गंभीर आरोप ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांनी केला. पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी मुंबईतील माहीमच्या कर्नाटक संघात २०१५ सालचे दया पवार स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यावेळी वागळे बोलत होते. दया पवार पुरस्कारचे यंदाचे १९ वे वर्ष असून पाच हजार रुपये रोख, शाल आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप होते. याप्रसंगी, प्रतिमा जोशी आणि कादंबरीकार, कवी भीमसेन देठे यांना पुरस्काराने गौरवण्यात आले.काँँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने कठोर कारवाई करण्याचे टाळले. त्यावेळी पोलिसांनी व्यावसाियक कर्तव्य बजावले असते. सनातनच्या आश्रमावर छापे टाकले असते तर मोहसीन शेख, डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे यांचे बळी गेले नसते असा दावा त्यांनी केला. तसेच सनातन संस्थेला काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप अशा सर्वपक्षीय नेत्यांकडून आर्थिक मदत होत आहे, असा आरोपही वागळे यांनी केला.देशभर आज हिंदुत्वाचा रावण उभा राहिला आहे. त्याला तोंड देण्याची धमक कुणाच्यातही नाही. एकीकडे नितीश-लालू आहेत तर दुसरीकडे काँग्रेस आहे. या दोघांनीही विश्वास गमावलेला आहे. त्यामुळे कवी, लेखक, पत्रकारांना वैयक्तीक आणि सामािजक अशा दोन्ही पातळ्यांवर लढाई करावी लागणार आहे, असा इशारा वागळे यांनी दिला. धमक्या येण्याच्या काळात लेखक, कवींनी दणकून बोलले पाहिजे, असे आवाहन करत अतिरेकी संघटनाविरुद्धची लढाई एकट्यादुकट्याची नाही तर संपूर्ण समाजाची असल्याचे सत्काराला उत्तर देताना प्रतिमा जोशी म्हणाल्या. रंगवेधच्या विद्यार्थ्यांनी यावेळी दया पवार यांच्या निवडक कविता सादर केल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवी सतीश काळसेकर होते. प्रतिष्ठानच्या अध्यक्षा हिरा पवार यांनी प्रास्ताविक केले.
‘सनातन’ काँग्रेस-राष्ट्रवादीचे पाप
By admin | Published: September 23, 2015 2:30 AM