मुंबई : तामिळनाडू सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर सनातन धर्मावर केलेल्या वक्तव्याबद्दल आणखी एक एफआयआर नोंदवण्यात आला आहे. धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली मुंबईतील मीरा रोड पोलिस स्टेशनमध्ये हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आयपीसी कलम 153 ए आणि 295 ए अन्वये हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. विश्वहिंदू परिषदेचे भाईंदरचे पदाधिकारी रुपेश दुबे यांच्या तक्रारीनंतर उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये उदयनिधी स्टॅलिन यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता, ज्यामध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा मुलगा प्रियांक खर्गे यांच्या नावाचाही समावेश आहे. उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्याचे समर्थन केल्याबद्दल एफआयआरमध्ये प्रियांक यांचे नाव नोंदवण्यात आले होते. याशिवाय, याच प्रकरणी बिहारमधील मुझफ्फरपूर मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात उदयनिधी स्टॅलिन यांच्याविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली होती.
दरम्यान, उदयनिधी स्टॅलिन हे सनातन धर्माविरोधात वक्तव्य करून गंभीर अडचणीत सापडले आहेत. एकीकडे भाजपसह देशभरातील अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. तसेच, तामिळनाडूतील भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी राज्य पोलिसांना निवेदन दिले असून, सत्ताधारी पक्षाचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे.
काय म्हणाले होते उदयनिधी स्टॅलिन?उदयनिधी स्टॅलिन यांनी शनिवारी (2 सप्टेंबर) चेन्नई येथे बोलताना सनातन धर्माची तुलना मलेरिया आणि डेंग्यूशी केली होती. उदयनिधी स्टॅलिन म्हणाले होते की, सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींचा विरोध करता येत नाही. त्या संपवल्याच पाहिजे. जसे की, डासांमुळे डेंग्यू, कोरोना आणि मलेरियासारखे आजार होतात. त्यांचा आपण विरोध करू शकत नाही, त्यांचा नायनाट करावा लागतो. सनातन धर्मही तसाच आहे, असे वक्तव्य त्यांनी केले होते.