मुंबई : सनातन संस्थेला प्रतिबंधित किंवा दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेले नाही, अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने २०१८ च्या नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणातील दोन आरोपींचा जामीन मंजूर करताना नोंदविली. न्या. सुनील शुक्रे व न्या. कमल खाता यांच्या खंडपीठाने लीलाधर ऊर्फ विजय लोधी व प्रताप हाजरा या दोघांचा जामीन शुक्रवारी मंजूर केला.
देशाला अस्थिर करण्याच्या कटात लोधी सहभागी होता. हिंदू राष्ट्र निर्माण करण्याचा हेतू असलेल्या सनातन संस्थेचा तो सक्रिय सदस्य आहे. आरोपीने क्रूड बॉम्ब तयार केले आणि जमाही केले, असा आरोप महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथका (एटीएस) ने केला. लोधीच्या घरातून क्रूड बॉम्ब जप्त केल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले.
कथित कटात लोधी सहभागी असल्याचा प्रथमदर्शनी पुरावा नाही. लोधीच्या घरातून क्रूड बॉम्ब जमा केल्याचेही कोणतेही प्रथमदर्शनी पुरावे नाहीत, असे न्यायालयाने म्हटले. सनातन संस्थेने सदस्यांसाठी प्रशिक्षण शिबिरे आयोजित केल्याच्या एटीएसच्या दाव्याचे समर्थन करणारे कोणतेही पुरावे नाहीत. सनातनला प्रतिबंधित वा दहशतवादी संघटना घोषित केलेली नाही, असे न्यायालयाने म्हटले.