- भक्ती सोमणआता पुढचे दहा दिवस आहेत ते फक्त गणपतीचे. या काळात त्याची किती सेवा करू, असे साऱ्यांनाच होऊन जाते. या सेवेतला गोड मेवा म्हणजे मोदक. मोदक केल्याशिवाय गणपतीचा सण परिपूर्ण झाला आहे, असे वाटतच नाही. मोदक आणि दुसऱ्या दिवशीची ऋषिपंचमी यांनी आपले वेगळे महत्त्व आणि अस्तित्व जपले आहे. वाजत-गाजत गणपती बाप्पांची स्वारी उद्यापासून पुढचे दहा दिवस विराजमान होईल. त्याच्या आगमनाने अवघ्या महाराष्ट्रात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण राहील. या दिवसात काय-काय करायचे, याची चर्चा मंडपापासून ते घराघरात झाली असेल. रोजचा प्रसाद काय करायचा, तेही ठरलेले असेल. मात्र, यात अग्रकम लागेल तो मोदकाचा. मोदक तर करायलाच हवा. कारण तो बाप्पाचा आवडता खाऊ आहे ना! त्यामुळे उद्याच्या मोदकांची तयारी गृहिणींनी केव्हाच सुरू केली असेल. एकंदरच लगबग सुरू झालेली असेल.या आनंदात एक प्रश्न मात्र पडला, गणपतीला मोदकच का आवडतात? दुसरा गोड पदार्थ का आवडत नाही? कोणी ठरवले गणपतीला मोदक द्यायचे?याविषयी वेगवेगळे मतप्रवाह दिसले. ज्येष्ठ पंचागकर्ते दा. कृ. सोमण यांना विचारल्यावर त्यांनी याची कथाच सांगितली. नारदमुनींनी अमृताचा मोदक शंकर-पार्वतीला दिला होता, पण तो मोदक हवा होता गणपती आणि कार्तिकला. त्यांचा बालहट्ट पाहूून शंकर पार्वतीने सांगितले की, जो जास्त सिद्धी प्राप्त करेल, त्याला हा मोदक मिळेल. सिद्धी प्राप्तीसाठी कार्तिकने पृथ्वीप्रदक्षिणेचा पर्याय निवडला, तर गणपतीने आपल्या आईवडिलांना शंकरपार्वतीला नमस्कार केला. गणेशाच्या कृतीने आनंदाने शंकर-पार्वतीने तो मोदक गणपतीला दिला. तेव्हापासून गणपतीचा आवडता पदार्थ म्हणून मोदकाची वर्णी लागली. मोद म्हणजे आनंद आणि मोदक म्हणजे आनंद देणारा. गणपती बरोबर भूमंडळाला आनंद देणारा हा पदार्थ म्हणून मोदक महत्त्वाचा ठरला, असे सोमण म्हणाले. बरे २१ मोदकच का करायचे, तर गणपती हा मातृभक्त आहे आणि मातृदेवता या २१ आहेत. म्हणून त्यांच्या स्मरणार्थ २१ मोदक करायचे, असे मानले जाते. मोदकाचा संबंध हा आरोग्याशीही निगडित आहे, असे मोबाइलवर आलेल्या एका संदेशामुळे कळले. वाचताना ते पटलेच पटले. त्यात वैद्य तनुजा गोखले म्हणतात की, भाद्रपद महिना हा वास्तविक पावसाळ्याचा जोर संपत येत, शरद ऋतूतील उष्म्याकडे घेऊन जाणारा काळ. या उष्म्याने पित्त वाढते. त्यातच वर्षाऋतूत वातही वाढलेला असतो. या वाढलेल्या वात-पित्ताला काबूत ठेवण्यासाठीच नारळ-खोबरे-तांंदूळ-गहू-साखर-गूळ-साजूक तूप असे आहारातील नेहमीचेच घटक, लाभदायक तरीही पौष्टिक, तृप्तीकारक पदार्थांचे सेवन करावे, असे सांगितले असल्याने मोदक केले जातात. मोदकाचे प्रामुख्याने तळणीचे आणि उकडीचे असे मुख्य प्रकार आहेत. स्थलकालापरत्वे त्यात अनेक प्रकारही पाहायला मिळत आहेत. मात्र, पारंपरिक पदार्थ म्हणून तळणीच्या मोदकाकडे पाहिले जाते. गव्हाच्या कणकेत नारळ, गूळ, जायफळ यांचे मिश्रण एकत्र करून ते भरले जाते आणि तळले जातात, पण आता तळणीचे म्हणून रवा-मैदा एकत्र केलेले मोदक करण्याची पद्धत रूढ झाली आहे. उकडीचे मोदक करणे हे कौशल्याचे काम असते. सारण फक्कड जमण्याबरोबरच त्याची पारी, कळी योग्य जमून येणे याला जास्त महत्त्व असते. ते मोदक करणे म्हणजे एक सोहळाच असतो. कारण घरी आलेल्या सर्वच गृहिणी आनंदाने या कामात सहभागी होतात. मोदक जमला तर अहाहा... चे सूर उमटतात. आता तर मोदकांचे विविध प्रकार बघायला मिळतात. यात फ्लेवर्स मोदकांची चलती जास्त आहे. तांदळाच्या पिठाच्या पारीला वेगवेगळे इन्सेस वापरले जात आहेत. चॉकलेटपासून, ड्रायफ्रुट्स मोदक, चिली मोदक, आईक्रीम मोदक असे विविध पर्याय आता अगदी सहज उपलब्ध झाले आहेत. थोडक्यात काय, तर मोदक आवर्जून केले जातातच. त्यांना दुसरा पर्याय नाहीच. पर्याय असेल तर तो फ्लेवर्सचा. त्यामुळे या दहा दिवसांत मोदकांचे रोज वेगळे फ्लेवर खातच हा आनंद वाढवू या. - गणपतीच्या दुसऱ्याच दिवशी असते ती ऋषिपंचमी. या ऋषिपंचमीला पौराणिक बाजू आहेच. मात्र, बैलाच्या मेहनतीचे या दिवशी खाऊ नये, म्हणजेच नांगरणी केलेले खायचे नाही, असे मानले जाते.शिवाय ऋषी आणि ऋषी पत्नींच्या स्मरणार्थही ऋषिपंचमी साजरी केली जाते. या दिवशी कंदमुळे आणि पालेभाज्या खाण्यावर अधिक भर दिला जातो. भेंडी, पडवळ, लाल भोपळा, सुरण, बेबी कॉर्न, अळू, लाल माठ, आंबट चुका, शेंगदाणे अशा पावसाच्या काळात मिळणाऱ्या प्रमुख भाज्या एकत्र करून त्या फक्त तेल वा तुपात शिजवल्या जातात. वरून मीठ आणि हवे असल्यास तिखट घालून केलेली ही भाजी खूप अप्रतिम लागते. आजही अनेक घरांत ही भाजी केली जाते. बाजारात तर एकत्र भाजीचे वाटेही मिळतात. गणपतीच्या पहिल्या दिवशी भरपूर गोड खाल्ले जाते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी पोटाला आराम मिळावा आणि पौष्टिक खाल्ले जावे, याही उद्देशाने कदाचित ऋषींची भाजी करत असावेत.
आला सण मोदकांचा!
By admin | Published: September 04, 2016 1:55 AM