एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ५०० कोटींच्या निधीला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:07 AM2021-08-28T04:07:32+5:302021-08-28T04:07:32+5:30
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन ऑगस्ट महिना संपत आला तरी मिळालेले नाही. मात्र आता एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ...
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन ऑगस्ट महिना संपत आला तरी मिळालेले नाही. मात्र आता एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य सरकारने ५०० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली असून, ती रक्कम एसटीच्या खात्यात वर्ग झाल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांना वेतन दिले जाणार आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
ऑगस्ट महिना संपत आला तरी राज्यातील एसटीच्या ९८ हजार कर्मचाऱ्यांचे जुलैचे वेतन झालेले नाही. त्यामुळे एसटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. घर चालविण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या पत्नी कामाला जात आहेत. काही जण भाजीपाला विकत आहेत, तर काही जण शेतात काम करत आहेत. त्यामुळे लवकर वेतन द्यावे अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत राज्य सरकारची बैठक झाली आहे. त्यामध्ये वेतनासाठी ५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ती रक्कम एसटीच्या खात्यात वर्ग होईल त्यानंतर कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात येईल.
- शेखर चन्ने, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ
एसटी कर्मचाऱ्यांना मुळात वेतन कमी असल्याने वेतन उशिरा मिळाल्यास त्यांच्या संसाराचे बजेट कोलमडून जाते. सरकार एसटी महामंडळाला मदत करत आहे, सरकारची ती जबाबदारी आहे. वेतनासाठी ६०० कोटींची मागणी करण्यात आलेली आहे, सरकारकडून ती वेळेत का दिली जात नाही. वेळेत वेतन न मिळाल्याने कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे हाल होत आहेत.
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस