वेतन थकल्याने एसटी कर्मचारी आंदोलनांच्या पवित्र्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 05:54 PM2020-06-05T17:54:39+5:302020-06-05T17:56:07+5:30
लॉकडाऊन काळात कामावर गैरहजर राहणाऱ्या कामगारांवर निलंबनाची कारवाई करू नये, कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत ठेवू नका, असे आदेश असताना एसटीचा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तिन्ही विभागाच्या अनेक एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत ठेवले आले.
मुंबई : लॉकडाऊन काळात कामावर गैरहजर राहणाऱ्या कामगारांवर निलंबनाची कारवाई करू नये, कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत ठेवू नका, असे आदेश असताना एसटीचा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तिन्ही विभागाच्या अनेक एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत ठेवले आले. मात्र मध्यवर्ती कार्यालयातील अधिकाऱ्यांना पूर्ण पगार देण्यात आला आहे. एसटी महामंडळाने मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातील अनेक कर्मचाऱ्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन थकीत असल्याने कर्मचाऱ्यांना घर कसे चालवायचे असा प्रश्न पडला आहे. महामंडळाला वेतन देण्याची जाग येत नसल्याने कर्मचारी एसटी महामंडळाविरोधात आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.
लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवेकरिता कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना मुंबई, ठाणे आणि पालघर या विभागातून कर्तव्यावर येण्यासाठी व त्यानंतर पुन्हा घरी जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने बस अत्यावश्यक सेवा म्हणून चालविण्यात येत आहे. या तिन्ही विभागातील काही चालक व वाहकांना जितके दिवस कामावर हजर होते, तितक्याच दिवसांचे वेतन एसटी महामंडळाने दिले आहे. याउलट संपूर्ण महिना गैरहजर असलेल्या मध्यवर्ती कार्यालयातील अधिकाऱ्यांना पूर्ण पगार देण्यात आला आहे. यासह राज्यातील इतर आगार व विभागांमधील कर्मचाऱ्यांना एसटीची सेवा बंद असताना पूर्ण महिन्याचा पगार देण्यात आला. त्यामुळे जीवाची पर्वा न करता सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्याची मागणी केली आहे. मात्र यावर एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी अडचणीत सापडले असून या संकटकाळत आर्थिक चणचण त्यांना भासत आहे. परिणामी, एसटी कर्मचारी एसटी कर्मचारी आंदोलन करण्याचा भूमिकेत आहेत.
मुंबई ठाणे आणि पालघर या तिन्ही विभागाच्या कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन मिळावे, याकरिता पाठपुरावा सुरू आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. कर्मचाऱ्यांना येत्या दोन दिवसांत वेतन मिळेल, असा विश्वास वरीष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. वेतन न झाल्यास कर्मचारी आंदोलन करणार आहेत.
- हिरेन रेडकर, सरचिटणीस , महाराष्ट्र एस.टी. कामगार सेवा