समुद्रकिनारी अवैध वाळू उपसा
By admin | Published: February 1, 2015 11:37 PM2015-02-01T23:37:33+5:302015-02-01T23:37:33+5:30
येथील समुद्रकिना-यांवर अनेक महिन्यांपासून राजरोसपणे बेकायदेशीर रेतीचा उपसा सुरू आहे. या रेतीचोरांवर कारवाई होत नसल्याने या परिसरात केवळ वाळू माफीयांचेच राज्य
डहाणू : येथील समुद्रकिना-यांवर अनेक महिन्यांपासून राजरोसपणे बेकायदेशीर रेतीचा उपसा सुरू आहे. या रेतीचोरांवर कारवाई होत नसल्याने या परिसरात केवळ वाळू माफीयांचेच राज्य असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे याच ठिकाणी तहसिलदार प्रांत, उप विभागीय पोलीस अधिकारी, उपवनअधिकारी यांचे निवासस्थान असून देखील चोरट्या वाळू उपशावर लाखोंचा व्यवसाय तेजीत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. डहाणूचे नैसर्गिक सौदर्य अबाधित ठेवण्यासाठी रेतीचोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
डहाणू तालुक्याला ५० कि. मी. लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. मात्र गेल्या अनेक महिन्यापासून वरोर, गुंगवाडा, डहाणू, दुबळपाडा, सतीपाडा, आगर, नरपड, चिखला, बोर्डी, इ. ठिकाणी रात्रदिवस वाळू उपसा केली जात आहे. पहाटेच्या वेळेसच समुद्रातून रेती काढण्याचे प्रमाण जास्त आहे. समुद्रातून रेती काढून बैलगाडीने किनाऱ्यावर किंवा रेतीचोरांच्या निवासस्थानी रेतीचा साठा केला जातो. त्यानंतर टेम्पो किंवा ट्रक भरून ही वाळू पुरविण्याचे काम डहाणूतील काही रेती माफीया करतात. तर या समुद्रकिनाऱ्यांना धूपप्रतिबंधक बंधारा नसल्याने समुद्राच्या उधाणाला लाटांचे तडाखे बसल्याने किनारपट्टीचे मोठे नुकसान होत आहे. त्यातच अवैध वाळू उपशामुळे बहुतांश सुरूची झाडे आणि वाळू खचू लागली आहेत. परिणामी हजारो पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या किना-यांचे सौदर्य नष्ट होत आहे.