Chandrashekhar Bawankule :'१५ दिवसात वाळू मिळणार, अन्यथा कारवाई करणार'; महसूलमंत्र्यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 18:28 IST2025-03-17T18:24:46+5:302025-03-17T18:28:19+5:30
Chandrashekhar Bawankule : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळात वाळू संदर्भात मोठी घोषणा केली.

Chandrashekhar Bawankule :'१५ दिवसात वाळू मिळणार, अन्यथा कारवाई करणार'; महसूलमंत्र्यांची घोषणा
Chandrashekhar Bawankule ( Marathi News ) : आज विधिमंडळात वाळू तस्करीवरुन भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जुगलबंदी पाहायला मिळाली. यानंतर बावनकुळे यांनी राज्य सरकारकडून लवकरच नवीन वाळू धोरण लागू करण्यात येणार असल्याची घोषणा केली. या नवीन धोरणानुसार आता घरकुलधारकांना अर्ज केल्यानंतर १५ दिवसात वाळू मिळणार आहे. वाळू न मिळाल्यास तहसिलदारांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधिमंडळात दिली.
पंधरा दिवसात वाळू दिली नाही तर तहसीलदारांवर कारवाई करणार का? मग धृतराष्ट्र सुद्धा कसे काम करतात हे पाहा, गाडी पकडली की त्या गाड्या सरकार जमा करा, असा निर्णय आम्ही वनविभागात घेतला होता. तसा निर्णय तुम्ही घेणार का? असा प्रश्न सुधीर मुनगंटीवार यांनी केला. यावर बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, सुधीर भाऊ यांनी अत्यंत महत्वाची गोष्ट मांडली आहे. तहसीलदारांनी १५ दिवसात वाळू दिली पाहिजे. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी तरतूद केली जाईल. सुधीर मुनगंटीवार यांनी ज्या सूचना केल्या आहेत त्याचा अभ्यास करुन निर्णय घेण्यात येईल, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
आठ दिवसात वाळू धोरण ठरवले जाईल. वाळू संदर्भात आतापर्यंत २८५ सूचना आल्या आहेत. यासाठी आता बाहेरील राज्यातील वाळू धोरणांचा अभ्यास करणार आहे. दगडापासून केलेली वाळू मोठ्या प्रमाणात वापरायची आहे. यासाठी क्रेशर्संना उद्योगाचा दर्जा देऊन सबसिडी देण्यात येणार आहे, असंही बावनकुळे म्हणाले. घरकुलांना ५ ब्रास वाळू देण्यात येणार आहे. दरम्यान, यावेळी भंडारा जिल्ह्यातील वाळू तस्करीवरुन प्रश्न उपस्थित करण्यात आले. भंडारा जिल्ह्यातील वाळू तस्करीची चौकशी करण्याचे आदेश मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.