मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आदेशानंतर मनसैनिकांकडून भोंग्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा प्रयत्न होत आहे. तर, दुसरीकडे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांकडून मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. राज ठाकरे यांच्या निवासस्थानाजवळून आज सकाळी मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी पोलिसांना चकवा देऊन निसटले. या दरम्यान झालेल्या झटापटीत एक महिला पोलीस जखमी झाल्याचे वृत्त आहे.
संदीप देशपांडेंच्या या कृत्यानंतर त्यांच्यावर कारवाई होणार असल्याची चर्चा होती. त्यातच आता गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. संदिप देशपांडे यांनी आज मुंबई पोलीस दलातील महिला अधिकारी यांचेशी केलेल्या गैरवर्तनाबद्दलची माहिती मी घेतली असून सदरच्या घडलेल्या गंभीर प्रकाराबद्दल तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिले आहेत, असं ट्विट शंभूराज देसाई यांनी केलं आहे.
मुंबईतील शिवाजी पार्क राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. माध्यमांशी बोलणं झाल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना पोलिसांनी ताब्यात घेत असल्याचे सांगितले. त्यावेळी संदीप देशपांडे यांनी आम्ही तुमच्यासोबत येत असल्याचे पोलिसांना सांगितले. याच वेळी एक खासगी कार पोलिसांच्या वाहनासमोर तयार होती.
संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी गर्दीतून वाट काढत कार गाठली. दोघंही कारमध्ये बसताच चालकानं कार दामटवली. पोलिसांनी कारच्या मागे धाव घेऊन ती थांबवण्याचा प्रयत्न केला खरा पण त्यात त्यांना यश आलं नाही. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी पोलिसांना चकवा देऊन निसटले.
राज ठाकरेंची पत्रकार परिषद-
मनसेच्या आंदोलनाबाबत आणि पुढील माहिती देण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे आता सर्वांचं लक्ष असणार आहे. राज्यात आज मनसेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. तसंच मनसेच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नोटीस देण्यात आली आहे. तर अनेकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यावरही राज ठाकरे आजच्या पत्रकार परिषदेतून भाष्य करणार असल्याचं सांगितलं जात आहे.