मुंबई - मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याचे राजकीय पडसाद उमटताना दिसत आहेत. या हल्ल्याप्रकरणी आता मनसे नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत थेट आदित्य ठाकरे, संजय राऊत यांना ताब्यात घेऊन चौकशी करा. जर या प्रकरणात ते दोषी असतील तर अटक करा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करणार असल्याचं मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सांगितले.
अमेय खोपकर म्हणाले की, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांना मुंबई पोलिसांनी तात्काळ ताब्यात घ्यावे आणि चौकशी करावी. गेल्या काही दिवसांपासून मुंबई महापालिकेचे भ्रष्टाचार संदीप देशपांडे बाहेर काढतायेत. आदित्य ठाकरे, संजय राऊतांची चौकशी करून त्यात तथ्य निघाले तर त्यांना अटक करावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे. संदीप देशपांडे गप्प बसणार नाहीत असं त्यांनी सांगितले.
तसेच संदीप देशपांडे यांना योग्य ती सुरक्षा मुंबई पोलिसांनी द्यावी. या भ्याड हल्ल्याचे उत्तर या लोकांना नक्की मिळेल. पाठिमागून हल्ले करू नका. स्वत:ला मर्द म्हणवता मग मागून हल्ले का करता? पुढे येऊन हल्ला करा. बेक्कल माणसांची चौकशी व्हावी. संदीप सतत महापालिका भ्रष्टाचार बाहेर काढतायेत आणि असे हल्ले होत असतील तर आम्ही गप्प बसायचं का? असं अमेय खोपकर म्हणाले. दरम्यान, संदीप देशपांडे हे मनसेची भूमिका कठोर आणि ठामपणे मांडत होते. हल्ल्यामागे कोण याची कारणे पोलीस शोधतील. देशपांडे वारंवार समाजासमोर लोकांवरील अन्याय समोर आणत होते हे खरे आहे असं स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी सांगितले आहे.
काय म्हणाले संदीप देशपांडे?या हल्ल्यानंतर संदीप देशपांडे यांनी माध्यमांना सांगितले की, या हल्ल्यामुळे मी घाबरणार नाही. भ्रष्टाचार बाहेर काढत राहणार. आम्ही कुणाला भीक घालत नाही. यामध्ये कोण लोक आहेत सगळ्यांना माहिती आहे असं त्यांनी म्हटलं. तर संदीप देशपांडे यांच्या हल्ल्यातील गुन्हेगार तात्काळ सापडले पाहिजे. पोलिसांनी काम चोख करावं. हल्लेखोरांना अटक करणे आणि त्यांच्यमागे जे कुणी असतील त्यांचाही शोध घेणे गरजेचे आहे. हे घडले त्याचा निषेध जेवढा करू तितका कमी आहे. मनसैनिक संतप्त आहेत. शिवाजी पार्कसारख्या ठिकाणी असे होणे अशी कल्पनाही कुणी केली नव्हती. कडक शासन झालेच पाहिजे असं मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी म्हटलं.