बोर्डिंग स्कूलने आयुष्याला नवी दिशा दिली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 03:01 PM2023-09-11T15:01:21+5:302023-09-11T15:03:16+5:30

Sandeep Deshpande:1984 सालात माझी रवानगी कर्नाटकातली बिदर जिल्ह्यातील माणिक पब्लिक स्कूलमध्ये झाली. तेव्हा मी पाचवीला होतो. या शाळेतील माझा प्रवेश हाच माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण होता. या शाळेमध्ये आल्यावर माझ्या व्यक्तिमत्त्वात आमूलाग्र बदल घडला. अजूनही शाळेचे ते दिवस लख्ख आठवतात.

Sandeep Deshpande: Boarding school gave a new direction to life | बोर्डिंग स्कूलने आयुष्याला नवी दिशा दिली

बोर्डिंग स्कूलने आयुष्याला नवी दिशा दिली

googlenewsNext

- संदीप देशपांडे 
(नेते, मनसे)

माझे चौथीपर्यंतचे शिक्षण दादरच्या भवानीशंकर रोडवरील शारदाश्रम विद्यामंदिर येथे झाले. शाळेत मी खूप मस्तीखोर विद्यार्थी होतो. माझ्याबद्दल कायम पालकांना तक्रारी जायच्या. आमच्या घरासमोर गोखलेवाडी होती. त्या वाडीतील एका मुलाशी माझी मारामारी झाली आणि त्यामध्ये त्या मुलाच्या नाकावर एक फाइट मारली. त्या वादात त्याच्या नाकातून रक्त आले. त्यावेळी मात्र आईचा संताप झाला. त्यावेळी मी चौथीत होतो. त्यावेळी घरच्यांनी निर्णय घेतला की याला बोर्डिंग स्कूलला टाकले पाहिजे, हा येथेच राहिला तर वाया जाईल. माझ्या आजोबांचे गुरू होते. त्यांची कर्नाटकात बिदर जिल्ह्यात माणिक पब्लिक स्कूल होती. निवासी शाळा होती. मला घरचे त्यांच्याकडे घेऊन गेले आणि त्यांनी मला विचारले, या शाळेत तुला यायला आवडेल का? मी म्हटलं हो, मात्र त्यांना मी सांगितले की ते भजन वगैरे काय ते मी करणार नाही. ते म्हणाले, काही करू नकोस, ये मस्त शिक आणि हवे ते खेळ. १९८४ सालात त्या शाळेत पाचवीला प्रवेश घेतला. 

त्या शाळेत गेल्यावर सगळेच नवीन होते. सगळ्या गोष्टी स्वतःच्या स्वतःलाच करायला लागायच्या. शिस्त होतीच. या ठिकाणी वादविवाद स्पर्धा व्हायच्या. त्यामध्ये मी सहभागी व्हायचो. स्टेज फियर गेले. सगळ्यांना सोबत घेऊन जायचे, एक लीडरशीपचा गुण आणि कौशल्य येथे शिकलो. धम्माल केली. त्या काळात खूप नवीन मित्र झाले. अभ्यासात फार हुशार नाही झालो, मात्र व्यक्तिमत्त्व विकासात आमूलाग्र बदल या शाळेमध्ये आल्यावर घडला. त्या शाळेत शिकलेल्या ज्ञानाची शिदोरी घेऊन दहावी करून परत मुंबईला आलो. 

मुंबईला परत आलो. रूपारेल कॉलेजला आर्ट्सला ॲडमिशन घेतली. तेथे माझी सुरेश गुजर या व्यक्तीशी ओळख झाली. तो भारतीय विद्यार्थी सेना (भाविसे) रूपारेल युनिट संभाळायचा. त्यावेळी कॉलेजमध्ये निवडणूक असायच्या. ११९१ ला डिव्हिजिन रिप्रेझेंटेटिव्ह (डीआर) निवडणुकीला मी उभा राहिलो, जिंकलो. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविणे सुरू होते. राजसाहेब त्यावेळी नियमित रुपारेल कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये यायचे. त्यांना बघायचो. त्यावेळी फार काही बोलणे झाले नाही. १९९६ साली भारतीय विद्यार्थी सेनेचा राज्य चिटणीस झालो. साहेबांनी नागपूर येथे बेरोजगार मोर्चाचे आयोजन केले होते. त्यावेळी मीटिंग ठेवली, त्यावेळी साहेबांशी जवळून संवाद झाला. आम्हाला विदर्भाची जबाबदारी देण्यात अली होती. त्यावेळी संजय चित्रे यांच्या हाताखाली काम केले. २००६ ला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा उपाध्यक्ष झालो. पक्षाने भरभरून दिले. या सगळ्या प्रक्रियेत बोर्डिंग स्कूलमध्ये जो गुण शिकलो तो खूप कामी आला, तो म्हणजे संयम ठेवणे गरजेचे आहे. 

Web Title: Sandeep Deshpande: Boarding school gave a new direction to life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.